वाढीव वीज बिलाची चौकशी करा

By Admin | Updated: July 2, 2014 23:25 IST2014-07-02T23:25:14+5:302014-07-02T23:25:14+5:30

येथील कृषी पंप धारकांना मिटरचे रिडींग न घेता बिल देयके देण्यात येत आहे. याबाबत आर्वीचे कार्यकारी अभियंता गायकवाड यांना दोन महिन्यांपूर्वी ५० शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी घेवून निवेदन सादर केले होते.

Investigate the electricity bill | वाढीव वीज बिलाची चौकशी करा

वाढीव वीज बिलाची चौकशी करा

वर्धमनेरी : येथील कृषी पंप धारकांना मिटरचे रिडींग न घेता बिल देयके देण्यात येत आहे. याबाबत आर्वीचे कार्यकारी अभियंता गायकवाड यांना दोन महिन्यांपूर्वी ५० शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी घेवून निवेदन सादर केले होते. चर्चासुद्धा करण्यात आली होती. रिडींग घेवून बिलाची दुरूस्ती करून देऊ, अशी ग्वाही गायकवाड यांनी दिली होती. मात्र देयके आली तेव्हा सरसकट सर्व कृषी पंपधारकांना ११४० युनिट दाखवून देयके देण्यात आल्याने वीज वितरण कंपनीच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह लागले आहे.
तीन ते चार वर्षांपासून रिडिंग न घेता बिल देण्यात येत आहे. प्रत्येक बिलात १००० ते २००० युनिट दाखविण्यात येत आहे. रिडींग घेवून बिलाची दुरूस्ती केली तर २५ टक्के इतकेच बिलात रक्कम येऊ शकते. याबाबत वेळोवेळी माहिती देऊनही अधिकारी दुर्लक्ष करीत आहे, उर्जा मंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालून चौकशी करण्यात यावी व दोषी असलेल्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, अशी कृषीपंपधारकाची मागणी आहे.
घरगुती चालू बिलाची रक्कम भरण्यास आठ दिवस उशिर झाला तर विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी भाड्याच्या गाडीने आठ ते दहा कर्मचाऱ्यांचा ताफा गावात येतात. विद्युत पुरवठा खंडित करण्याकरिता वर्धामनेरी, खानवाडी, मांडला, जळगाव, परतोडा या परिसरात फिरुन घरगुती विद्युत पुरवठा खंडित करतात. वीज पुरवठा खंडित करण्याकरिता कंपनीजवळ कर्मचारी उपलब्ध आहे, पण कृषी पंपाचे रिडींग घेण्याकरिता व बिलात दुुरूस्त करण्याकरिता कंपनीजवळ कर्मचारी मात्र उपलब्ध नाही, अशी स्थिती आहे.
विचारणा केली, तर कृषी संजिवनीचा फायदा घ्या, असे सांगण्यात येत आहे.
सर्व कृषी पंपधारकांकडे ३ एचपी पॉवरच्या मोटारी असताना बिलात मात्र पाच एच पीच्या मोटारी दाखवून बिल काढण्यात येत आहे.
राज्य शासनाच्या संबंधित खात्याने योग्य चौकशी करून शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी पंपाचे बिल योग्य रिडींग घेऊन दिले तर ७००० कोटी रुपयांची रक्कम २००० कोटींवर येवू शकते. एकीकडे निसर्ग साथ देत नाही. सध्या शेतकरी विवंचनेत सापडला आहे. बँका कर्ज द्यायला तयार नाहीत. नाईलाजास्तव सावकरापासून पैसे घेऊन कसे तरी बियाने खरेदी करीत आहे. विद्युत वितरण कंपनी कृषीधारकांची जास्तीचे आकडे घेऊन बोगस बिल देत आहे. यापूर्वी काही पंपधारकांनी २० ते ३० टक्के बिल भरूनसुद्धा बिलात मात्र काहीही दाखविण्यात आले नाही. याची चौकशी करण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.(वार्ताहर)

Web Title: Investigate the electricity bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.