फलक नसल्याने गतिरोधक देताहेत अपघातास निमंत्रण
By Admin | Updated: December 31, 2015 02:24 IST2015-12-31T02:24:34+5:302015-12-31T02:24:34+5:30
रस्ता चांगला असला तरी बहुतांश ठिकाणी गतिरोधक तयार करण्यात आले आहे.

फलक नसल्याने गतिरोधक देताहेत अपघातास निमंत्रण
संबंधितांचे दुर्लक्ष : प्रवासी झाले त्रस्त
घोराड : रस्ता चांगला असला तरी बहुतांश ठिकाणी गतिरोधक तयार करण्यात आले आहे. पण येथे गतिरोधक आहे असा फलकच पाहावयास मिळत नसल्याने वाहनधारकांना किरकोळ अपघाताला सामोरे जावे लागत आहे.
सेलू येथील विकास चौकात घडणारे अपघात पाहता नागरिकांच्या मागणीनुसार वर्धा नागपूर मार्गावर दोन तर हिंगणीकडे जाणाऱ्या मार्गावर एका गतिरोधकाची निर्मिती करण्यात आली. तसेच सेलू पंचायत समितीजवळ, मोही गावाजवळ असे अनेक ठिकाणी गतिरोधक तयार करून भरधाव धावणाऱ्या वाहनाची गती कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
गतिरोधक तयार केल्यावर तिथे गतिरोधक असल्याचा फलक लावणे गरजेचे आहे. असे फलक लावण्याचा मात्र बांधकाम विभागाला विसर पडला आहे. त्यामुळे हे गतिरोधक आता अपघातास कारणीभूत ठरत आहे. काही ठिकाणी या गतीरोधकावर पांढरे पट्टे सुद्धा मारण्यात आलेले नाही. त्यामुळे वेगाने येत असलेल्या वाहनांना गती नियंत्रित करणे शक्य होत नाही. अश्या वेळेस वाहने अनियंत्रित होऊन अपघात होत आहेत. हा प्रकार आता नित्याचाच झाला आहे.
किरकोळ अपघात रोखण्यासाठी रस्त्यावर ज्या ठिकाणी गतिरोधक आहे. अशा ठिकाणी समोरे गतिरोधक असल्याचा फलक लावावा तसेच गतिरोधकावर पांढरे पट्टे मारावे अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.(वार्ताहर)