पिकांची आंतरमशागत खोळंबली
By Admin | Updated: July 13, 2016 02:44 IST2016-07-13T02:44:36+5:302016-07-13T02:44:36+5:30
गत आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या पावसापासून उघडीप मिळताच शेतकऱ्यांनी कामांना प्रारंभ केला होता.

पिकांची आंतरमशागत खोळंबली
जिल्ह्यात पुन्हा संततधार : अनेक शेतात साचले पाणी; देवळीत नुकसानीचा सर्व्हे सुरू
वर्धा : गत आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या पावसापासून उघडीप मिळताच शेतकऱ्यांनी कामांना प्रारंभ केला होता. पावसामुळे जमिनीत पेरलेली बियाणे अंकुरली आहेत. त्यांच्या वाढीकरिता आंतरमशागत होणे गरजेचे आहे. अशातच मंगळवारी सकाळपासून पुन्हा संततधार पावसाने हजेरी लावली. या सततच्या पावसामुळे शेतीच्या कामांना पुन्हा ब्रेक लागला आहे. आंतरमशागतीची कामे रखडल्यामुळे शेतकऱ्यांना पावसापासून जरा उघडीप मिळण्याची प्रतीक्षा आहे.
जिल्ह्यात मंगळवारी सकाळपर्यंत सरासरी १५.१८ मिमी पावसाची नोंद झाली. यात वर्धा तालुक्यात १०.१० मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर सेलू ३, देवळी ७.१०, हिंगणघाट ११.२० समुद्रपूर २२, आर्वी २४, आष्टी (शहीद) २९ तर कारंजा (घाडगे) तालुक्यात १५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ही नोंद सकाळी ८ वाजताची असली तरी दिवसभर पाऊस सुरूच होता. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले आहे. सकाळी सुरू झालेल्या पावसाने सायंकाळी थोडी उघडीप दिल्याचे दिसून आले.
गत आठवड्यात जिल्ह्यात सेलू वगळता सात तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. यातच निम्न वर्धा प्रकल्पाची ३१ दारे उघडण्यात आल्याने वर्धा नदी परिसरात असलेल्या शेतात पाणी साचले होते. यात झालेल्या नुकसानीचा सर्व्हे करण्यात येत असल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. या सर्वेक्षणानंतरच झालेल्या नुकसानाचा अंदाज येणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले. पाणी ओसरल्यावर शेतीची कामे करण्याच्या प्रयत्नात असलेल्या शेतकऱ्यांच्या आशा मंगळवारी आलेल्या पावसामुळे मंदावल्या आहेत. यामुळे पावसाची पुन्हा सुरू झालेली रिपरिप बंद होण्याची प्रतीक्षा शेतकरी वर्गाला लागली आहे.
सतत सुरू असलेल्या पावसामुळे पूर्ण पेरण्या आटोपल्या आहेत. पेरण्यानंतर आलेल्या पावसामुळे बियाणे अंकुरली आहेत. त्यांच्या योग्य वाढीकरिता पिकांची आंतरमशागत वेळेवर होणे गरजेचे आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून डवरणीची कामे सुरू झाली आहेत; मात्र पाऊस शेतकऱ्यांचा पिच्छा पुरवित असल्याने आंतरमशागतीच्या कामांत व्यत्यय येत आहे. यामुळे पिकांना खत देण्याचे काम रखडले आहे. परिणामी आता किमान दोन ते चार दिवसांकरिता पाऊस थांबावा अशी इच्छा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
पुलाच्या बांधकामाअभावी शेताला तलावाचे स्वरूप
देवळी - पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत तालुक्यातील फत्तेपूर-मुरदगाव रस्त्याच्या उंच भागामुळे शेतातील पाणी अडल्याने परिसराला तलावाचे स्वरुप आले आहे. या रस्त्यावर पुलाचे बांधकाम न केल्यामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. बांधकाम विभागाच्या नाकर्तेपणामुळे संपूर्ण शेतच पाण्याखली आल्याने संबंधित शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
फत्तेपूर-मुरदगाव मार्गावरील अरुण इंगोले यांच्या मालकीचे १० एकर शेत पुंडलिक जामनकर यांनी एक वर्षाच्या ठेक्याने घेतले. यामध्ये त्यांनी कपाशीची लागवड केली. शेताच्या ठेक्यासहित एक लाखांचा खर्च केला; परंतु शेतातील पाणी जाण्यास मार्ग नसल्याने त्यांचे संपूर्ण पीक पाण्याखाली आले. शेतपरिसराला तलावाचे स्वरुप आले आहे. आता आम्ही आत्महत्या करायची काय, असा संतप्त सवाल जामनकर यांनी केला आहे. एकीकडे फत्तेपूर-मुरदगाव हा ग्रामीण रस्ता तर दुसरीकडे लोअर वर्धाच्या कॅनलमुळे या भागातील कास्तकारांची अडवणूक झाली आहे.
पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत या रस्त्यावर पुलाचे बांधकाम रखडल्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास मार्ग नाही. यासाठी उन्हाळ्याच्या दिवसात अधिकाऱ्यांचे उंबरठे झिजविण्यात आले; परंतु याचा काहीच फायदा झाला नाही. अधिकाऱ्यांच्या कामचोर वृत्तीमुळे माझे नुकसान झाले असा आरोप संबंधित कास्तकाराने तहसीलदार तेजस्विनी जाधव यांच्यासमक्ष केला. तहसीलदार जाधव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्या असून पुलाची पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचना केल्या आहेत.(प्रतिनिधी)