पाच हजार भगिनींना विम्याचे संरक्षण
By Admin | Updated: August 30, 2015 01:57 IST2015-08-30T01:57:12+5:302015-08-30T01:57:12+5:30
रक्षाबंधनानिमित्त बहिणीला भेट म्हणून खासदार रामदास तडस यांच्यावतीने तालुक्यातील ५ हजार महिलांना २ लाख रुपयांच्या विम्याचे सुरक्षा कवच प्रदान करण्यात आले.

पाच हजार भगिनींना विम्याचे संरक्षण
रक्षाबंधनानिमित्त देवळीत खासदारांकडून योजनेची अंमलबजावणी
देवळी : रक्षाबंधनानिमित्त बहिणीला भेट म्हणून खासदार रामदास तडस यांच्यावतीने तालुक्यातील ५ हजार महिलांना २ लाख रुपयांच्या विम्याचे सुरक्षा कवच प्रदान करण्यात आले. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत १७ ते ७० वयोगटातील महिलांचे आवेदने भरून घेण्यात आली.
एकट्या देवळीत दोन हजार महिला भगिनींना विम्याचे सुरक्षा कवच प्रदान करण्यात आले. भाजपा कार्यालयात आयोजित कार्यक्रमात खासदार तडस यांच्या हस्ते योजनेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी विविध बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
रक्षाबंधनानिमित्त बहिणीला भेट म्हणून हा उपक्रम येत्या पाच वर्षापर्यंत राबविण्यात येणार आहे. या दिवशी वर्धा लोकसभा मतदार संघात १५ हजार तसेच देवळी तालुक्यात पाच हजार महिला भगिनींना विम्याचे कवच दिले जाणार आहे. घरातील कर्त्या व्यक्तीवर दुदैवी प्रसंग ओढविल्यास कुटुंबीयांना दोन लाखापर्यंतची मदत व्हावी या हेतुने ही योजना कार्यान्वित करण्यात आली, असे विचार खासदार तडस यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
देवळी तालुक्यात भीडी, मलकापूर, शिरपूर, सोनेगाव (आबाजी), पुलगाव, नाचणगाव, मुरदगाव, बाभुळगाव व इतर पाच गावात या योजनेंतर्गत महिलांचा विमा काढण्यात आला. कार्यक्रमाला नगराध्यक्ष शोभा तडस, उपाध्यक्ष विजय गोमासे, न.प. सदस्य दिलीप कारोटकर, कृष्णा शेंडे, राहुल चोपडा, विलास जोशी, शरद सातपुते, शरद आदमने तसेच महिला न.प. सदस्यांनी सहभाग दिला.(प्रतिनिधी)