शेतकरी कुटुंबांसाठी प्रेरणा प्रकल्प
By Admin | Updated: November 8, 2015 02:13 IST2015-11-08T02:13:05+5:302015-11-08T02:13:05+5:30
शेतकरी आत्महत्येचे वाढते प्रमाण लक्षात घेता शासनाने शेतकरी आरोग्यसेवा कार्यक्रमांतर्गत विदर्भ व मराठवाडा ...

शेतकरी कुटुंबांसाठी प्रेरणा प्रकल्प
देवळी तालुक्यात आशा स्वयंसेविकांचे मार्गदर्शन शिबिर
पुलगाव : शेतकरी आत्महत्येचे वाढते प्रमाण लक्षात घेता शासनाने शेतकरी आरोग्यसेवा कार्यक्रमांतर्गत विदर्भ व मराठवाडा विभागातील १४ जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबाना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासंदर्भात प्रेरणा प्रकल्प जाहीर केला आहे. याची माहिती देण्याची जबाबदारी आशा स्वयंसेविकावर सोपविली आहे.
शासन निर्णयानुसार जिल्ह्यात प्रेरणा प्रकल्पाची सुरुवात झाली आहे. देवळी तालुक्यातील नाचणगाव, गौळ, विजयगोपाल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात व परिसरातील गावात कार्यरत आशा स्वयंसेविकांना योजनेचे प्रशिक्षण देवून जिल्हास्तरावरील तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले.
कुटुंबातील आजारी रुग्णांकरिता औषधोपचार, रुग्णवाहिका उपलब्धता, कौटुंबिक समुपदेशन या प्रकल्पातून केले जाणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रघुविरसिंग दिदावत यांच्या मार्गदर्शनात नाचणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात या योजनेचा प्रारंभ झाला. यावेळी अतिथी म्हणून जि.प. कृषी व पशुसंवर्धन सभापती श्यामलता अग्रवाल, वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर गवई उपस्थित होते. राज्यातील विदर्भ मराठवाडा येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब असलेल्या १४ जिल्ह्यात एकूण २० हजार ३२५ आशा स्वयंसेविकांची पदे मंजूर आहेत. या जिल्ह्यातील आशांना तालुका स्तरावर एक दिवसाचे मानसिक आरोग्य व इतर बाबीचे तसेच एक दिवसाचे आरोग्य केंद्रस्तरावर प्रशिक्षण देण्यात येत असून आरोग्य उपकेंद्राचे आरोग्य सेवक सेविका यांनाही हे प्रशिक्षण देण्यात येईल. या प्रकल्पासाठी घरी येणाऱ्या आशा स्वयंसेविकांना शेतकरी कुटुंबीयांनी सहकार्य करून लाभ घेण्याची गरज आहे.(तालुका प्रतिनिधी)