वाहनांच्या गतीला आवर घाला
By Admin | Updated: March 16, 2015 01:41 IST2015-03-16T01:41:42+5:302015-03-16T01:41:42+5:30
येथील यशवंत चौक ते सेलू ग्रामपंचायत कार्यालय मार्गावर शाळा, महाविद्यालय व बाहारपेठ असल्याने सतत वर्दळ असते.

वाहनांच्या गतीला आवर घाला
सेलू : येथील यशवंत चौक ते सेलू ग्रामपंचायत कार्यालय मार्गावर शाळा, महाविद्यालय व बाहारपेठ असल्याने सतत वर्दळ असते. मात्र या मार्गावर सुसाट वेगाने वाहने हाकणारे चालकही असतात. यामुळे या मार्गावर किरकोळ अपघाताची घटना हा नित्याचाच प्रकार आहे. या अपघाताचा भुर्दंड सामान्यांना नाहक सहन करावा लागतो. या गतीला आवर घालण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
वाहनांकरिता तासी २० कि.मी. अशी वेग मर्यादा निश्चित करून त्याचे फलक लावावे. शिवाय वेगाने वाहन हाकलत असलेल्या चालकावर कारवाई कारण्यात यावी, अशी मागणी केली आहे. वेगमर्यादेचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाईचे प्रावधान आहे. यामुळे येथे वेगमर्यादा निश्चित करणे गरजेचे झाले आहे. दंडात्मक कारवाई केल्यावर काही प्रमाणात का होईना या प्रकाराला आळा बसू शकतो.
सेलू शहरात अनेक चालक विनापरवाना गाड्या चालवित असतात. काहींचे वय कमी असल्याने त्यांना अनुज्ञप्ती दिली जात नाही. काही दुचाकी वाहने विना पासिंग असताना रस्त्यावरून धावताना दिसतात. अशातच अपघात झाल्यास याला कोण जबाबदार असणार, याकरिता ही उपाययोजना करण्यात यावी तसेच अशा चालकांवर कारवाईची करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यावेळी सेलू शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र दंढारे, शहर प्रमुख विनोद गोमासे, प्रकाश डुकरे, प्रमोद खाडीलकर, प्रकाश नौकरकर, शैलेश बिसेन आदी उपस्थित होते. या मागण्याचे निवेदन ठाणेदार संजय बाकल यांनी स्विकारले.(तालुका प्रतिनिधी)