वणाच्या अस्तित्वावर घाला
By Admin | Updated: February 19, 2017 01:50 IST2017-02-19T01:50:34+5:302017-02-19T01:50:34+5:30
रेतीघाट लिलावांतून शासनाला महसूल मिळतो, ही बाब खरी असली तरी या माध्यमातून होणारा रेतीचा

वणाच्या अस्तित्वावर घाला
नदी ठरतेय खडकांचा प्रदेश : पर्यावरण संवर्धन संस्थेने वेधले लक्ष
हिंगणघाट : रेतीघाट लिलावांतून शासनाला महसूल मिळतो, ही बाब खरी असली तरी या माध्यमातून होणारा रेतीचा अतिरेकी उपसा नद्यांच्या जीवावर उठला आहे. सध्य वणा नदी अखेरच्या घटकाच मोजत असून अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. वणा नदी डबक्यात रूपांतरीत झाली असून रेतीची निर्मितीही होत नाही. परिणामी, जैविक विविधताही नष्ट होत आहे. पर्यावरण विभाग व प्रशासनाने याकडे लक्ष देत नदी वाचविणे गरजेचे झाले आहे.
शहराला वेढा घालून वाहणारी वणा नदी रेतीच्या अतिउपस्यामुळे सध्या मृतप्राय झाली आहे. नदीचे डबक्यात रुपांतर झाले असून पात्रात शेवाळ वाढले आहे. नदी विद्रुप झाली. परिणामी, पर्यावरणाचा ऱ्हास झाला असून जैविक विविधता नष्ट झाली आहे. यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असून नदी पात्रात वाळू नसल्याने नदी कोरडी झाली आहे. पाण्याची पातळी खोल गेली आहे. यामुळे नदी पात्रात वाळूचा भरणा करून पुढे होणाऱ्या पर्यावरणाच्या ऱ्हासाला वाचवावे व नदीचे सौंदर्य टिकवावे, अशी मागणी पर्यावरण संवर्धन संस्थेने तहसीलदार सचिन यादव यांना निवेदनातून केली आहे. या बाबीकडे त्वरित लक्ष देऊन शहराची ओळख असलेल्या वणा नदीचे अस्तित्व टिकविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणीही आशिष भोयर, अभिजीत डाखोरे, मनोहर ढगे, छत्रपती भोयर, प्रदीप गिरडे, रमेश झाडे, प्रवीण कडू, ज्ञानेश चौधरी, सतीश चौधरी, नितीन शिंगरू, योगेश तपासे, हेमंत हिवरकर, सचिन थूल यांनी केली आहे.(तालुका प्रतिनिधी)
रेती नसल्याने नदी पात्राला पडली कोरड
प्रशासनाकडून महसूल मिळविण्यासाठी रेती घाटांचे लिलाव केले जातात. यात घाट धारकास रेती काढण्याचे प्रमाण ठरवून दिले जाते. असे असले तरी ते केवळ कागदावरच असते. अर्थपूर्ण व्यवहारांतून अक्षरश: नदीचे पात्रच ओरबाडले जात असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, नद्यांचे अस्तित्वच धोक्यात येत असल्याचे पाहावयास मिळत आहे. गत कित्येक वर्षांपासून वणा नदीतील रेतीचा अतिरेकी उपसा केला जात आहे. आता या नदीमध्ये रेतीच शिल्लक राहिली नसल्याने नदी पात्राचे रुपांतर डबक्यात झाले आहे. परिणामी, पाण्यातील जीव-जंतू नष्ट होत असून पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे.