अवैध गॅस जोडणीची चौकशी करा
By Admin | Updated: July 13, 2015 02:15 IST2015-07-13T02:15:00+5:302015-07-13T02:15:00+5:30
समुद्रपूर तालुक्यात सद्यस्थितीत अवैधरीत्या गॅस जोडणी देणे सुरू आहे. यात नियमांचे उल्लंघन करून हिंगणघाट येथील एजन्सीच्या माध्यमातून हा प्रकार सुरू आहे.

अवैध गॅस जोडणीची चौकशी करा
वर्धा : समुद्रपूर तालुक्यात सद्यस्थितीत अवैधरीत्या गॅस जोडणी देणे सुरू आहे. यात नियमांचे उल्लंघन करून हिंगणघाट येथील एजन्सीच्या माध्यमातून हा प्रकार सुरू आहे. याबाबत समुद्रपूर येथील तहसीलदार यांच्याकडे तक्रार देऊन चौकशी करण्याची मागणी केली आहे.
नियमाप्रमाणे ज्या ठिकाणी अधिकृत एजन्सी असेल त्या ठिकाणी इतरत्र असलेल्या एजन्सीचा वावर नसतो. त्यामुळे ही गॅस जोडणी अवैध ठरते. या प्रकाराला आळा घालण्यासाठी कारवाईची मागणी करण्यात आली. समुद्रपूर येथे शासनाचा परवानाधारक एजन्सी कार्यरत आहे. अशातच हिंगणघाट येथील परवानाधारक एजन्सीने समुद्रपूर शहर तसेच परिसरातील गावात जोडणी देण्याचा सपाटा सुरू केला आहे. यात बीपीएल धारक तसेच नियमित ग्राहकांना समाविष्ट करण्यात येत आहे. भारत सरकारच्या नियम अटी व धोरणानुसार अन्यत्र असलेल्या एजन्सीने ग्राहकांना जोडणी अथवा सिलिंडरची विक्री करणे गैर असते. समुद्रपूर येथील कार्यालयाचा अधिकृत परवाना नसताना येथे जोडणी देऊन ग्राहकांना सिलिंडरची सर्रास विक्री सुरू आहे. यामुळे आजवर ज्या ग्राहकांना गॅस जोडणी दिली त्यांची जोडणी अवैध ठरते. याची माहिती ग्राहकांना नसल्याने हा प्रकार सुरू आहे. अतिज्वलनशील व स्फोटक वस्तूची याप्रमाणे विक्री होत असताना याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. याची दखल घेणे गरजेचे ठरत असून याला पायबंद कडक कारवाईची मागणी करण्यात आली. वरिष्ठांनी या बाबीची दखल घेण्याची मागणी करण्यात आली.(स्थानिक प्रतिनिधी)