अभिनव धूलिवंदनाचा समारोप
By Admin | Updated: March 8, 2015 01:49 IST2015-03-08T01:49:04+5:302015-03-08T01:49:04+5:30
सुरगाव गावाने १८ वर्षांची परंपरा सांभाळत अभिनव धुलिवंदन आणि संतविचार ज्ञानयज्ञ ४, ५, व ६ मार्च असा सलग तीन दिवस राबविला.

अभिनव धूलिवंदनाचा समारोप
सेलू : सुरगाव गावाने १८ वर्षांची परंपरा सांभाळत अभिनव धुलिवंदन आणि संतविचार ज्ञानयज्ञ ४, ५, व ६ मार्च असा सलग तीन दिवस राबविला. या तीन दिवसात विविध समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम उपस्थितांसाठी पर्वणी ठरले. धुलिवंदनाच्या दिवशी शुक्रवारी याचा समारोप कार्यक्रम झाला.
गावातील तसेच इतर जिल्ह्यातील व पंचक्रोशीतून आलेल्या लोकांनी या रंगाविणा आदर्श धुळवडीला डोक्यात साठवून घेतले. सकाळी आरशा सारख्या स्वच्छ रस्त्यावरून सडामार्जन व रांगोळी घातलेल्या अंगणात राष्ट्रसंताचे व इतर संताचे दारात आसनावर सजविलेले फोटो त्यापुढे लावलेला शांत नंदादीप व अगरबत्तीचा सुगंध वातावरणात प्रसन्नता आणून गेला. डोक्यावर भगव्या टोप्या घातलेले लहान थोर, महिला यांचा समावेश असलेली नामधून (प्रभातफेरी) राष्ट्रसंताचा गजर करीत गावभर फिरून झाल्यावर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सप्तखंजेरीवादक इंजिनिअर भाऊसाहेब थुटे होते.
पाहुणे म्हणून ठाणेदार संतोष बाकल, समाजसेवक सुनील बुरांडे, मोहन अग्रवाल आदींसह आदिवासी नेते अवचित सयाम, भास्कर वाळके, रवी खडतकर, अनिल चौधरी, बा.दे. हांडे, बा. या. वागदरकर, सुरेश मांडळे, जर्नादनपंत ठाकरे, बुरांडे, सुरेश वानखेडे, शेख मेहबुब, किशोर करंदे, उकेश चंदनखेडे, धर्मेश झाडे, मारोती साव, अहिल्याबाई पुरस्कार प्राप्त सुमन चांदेकर(चंद्रपूर), कविता येनूरकर (सेवाग्राम), मेश्राम गुरूजी (खंबाळा), यांच्यासह विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या मान्यवरांची उपस्थिती होती.
प्रास्ताविक मुख्य आयोजक प्रवीण महाराज देशमुख यांनी केले. आयोजनामागील भूमिका व १८ वर्षांच्या निरंतर प्रवासाचा उल्लेख त्यांनी केला. याप्रसंगी मोहन अग्रवाल, अनिल चौधरी, अवचित समयार, धर्मेश झाडे यांनी मनोगत व्यक्त केले.