वर्धेतील परंपरा जपण्याकरिता पुढाकार
By Admin | Updated: May 5, 2017 02:02 IST2017-05-05T02:02:01+5:302017-05-05T02:02:01+5:30
शहरात विविध संघटनांद्वारे सामूहिक विवाह सोहळे घेतले जात होते; पण ती परंपरा खंडित झाली.

वर्धेतील परंपरा जपण्याकरिता पुढाकार
पत्रकार परिषद : ३१ जोडपी होणार विवाहबद्ध
वर्धा : शहरात विविध संघटनांद्वारे सामूहिक विवाह सोहळे घेतले जात होते; पण ती परंपरा खंडित झाली. यामुळे वर्धा मंडप बिछायत, इलेक्ट्रिक डेकोरेशन साऊंड सिस्टिम आणि कॅटरर्स असोसिएशनने सेवा समिती वर्धा स्थापन करीत ही परंपरा कायम राखण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यात ७ मे रोजी शहरातील जुन्या आरटीओ मैदानावर सामूहिक विवाह सोहळा घेण्यात येत असून ३१ जोडपी विवाहबद्ध होणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत राठी यांनी सांगितले.
सर्वधर्मिय सामूहिक विवाह सोहळ्याची माहिती देण्याकरिता जुन्या आरटीओ मैदानावर आयोजित पत्रकार परिषदेत ते माहिती देत होते. यावेळी उपाध्यक्ष प्रशांत कोल्हे, सचिव सुनील भोवरे, सहसचिव संजय ठाकरे, कोषाध्यक्ष विजय ठकरे, कॅटरर्स असोसिएशनचे शिवा तरोडकर आदी उपस्थित होते. सर्वधर्मिय सामूहिक विवाह सोहळ्यात अनुसूचित जातीची १९, पाच इतर मागास वर्गीय, एक मुस्लीम आणि सहा आदिवासी जोडपी सहभागी होणार आहेत. विवाहबद्ध होणाऱ्या जोडप्यांना शासनाकडून दहा हजार रुपयांचा धनादेश, सहा हजारांचे डोळ-डोरले, चार हजारांचे भांडे दिले जाणार आहे. शिवाय आयोजकांकडून वधुला साडी, वराचे कपडे, एक ग्रॅम सोन्याची पोत यासह स्वयंपाकाची भांडी देण्यात येणार आहे.
सहभागी वरांची वरात बच्छराज धर्मशाळेतून दुपारी ३.३० वाजता निघणार असून शिवाजी चौक, आर्वी नाका चौक येथून जुन्या आरटीओ चौकात पोहोचणार आहे. सायंकाळी ६.३० वाजता विवाह पार पडणार आहे. वर-वधूकडील प्रत्येकी ५० वऱ्हाडी लग्नात सहभागी होणार असून एकूण ८ ते १० हजार लोक उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. वऱ्हाड्यांच्या जेवणाची व्यवस्था कॅटरर्स असोसिएशनकडून करण्यात येणार आहे. सोहळ्याची तयारी अंतीम टप्प्यात असून ९० हजार स्क्वेअर फुट जागेत मंडप उभारण्यात आला आहे. सामूहिक विवाह सोहळा पार पाडण्याकरिता संघटनांचे १७५ सदस्य झटत असल्याची माहितीही राठी, कोल्हे, ठाकरे यांनी दिली. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)