१० वर्षांत पहिल्यांदाच मिळाली १५ दिवसात माहिती
By Admin | Updated: June 29, 2015 02:38 IST2015-06-29T02:38:17+5:302015-06-29T02:38:17+5:30
माहिती अधिकाराअंतर्गत मागितलेली माहिती बरेचदा प्रथम, द्वितीय अपिल केल्यानंतरही उपलब्ध करण्यास दिरंगाई केली जाते.

१० वर्षांत पहिल्यांदाच मिळाली १५ दिवसात माहिती
अधिकारी बदलताच पद्धती बदलल्याची चर्चा
वर्धा : माहिती अधिकाराअंतर्गत मागितलेली माहिती बरेचदा प्रथम, द्वितीय अपिल केल्यानंतरही उपलब्ध करण्यास दिरंगाई केली जाते. परंतु केवळ पंधरा दिवसांत माहिती उपलब्ध झाल्याची किमया १० वर्षांत पहिल्यांदाच घडली. त्यामुळे अधिकारी बदलताच कार्यपद्धतीतही बदल जाणवत असल्याचे बोलल्या जात आहे.
माहिती अधिकारांतर्गत माहिती उपलब्ध करण्यासाठी निश्चित कालावधी देण्यात आला आहे. माहिती उपलब्ध न केल्यास प्रथम आणि त्यानंतर द्वितीय अपिल केले जाते. बऱ्याच प्रकरणांमध्ये दुसरे अपिल दाखल करेपर्यंतची परिस्थिती निर्माण होते. काही प्रकरणात तर अधिकारी कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाईदेखील झाली आहे. शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते ताराचंद चौबे यांनी अकरा ग्रामपंचायतींच्या बांधकामाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती अधिकाराचा अर्ज सादर केला. यावेळी चौबे यांना केवळ पंधरा दिवसांतच ही माहिती उपलब्ध करवून देण्यात आली. एरवी माहिती देण्यास टाळाटाळ होत असताना, मागील दहा वर्षात प्रथमच अवघ्या पंधरा दिवसात माहिती उपलब्ध झाल्याचे ताराचंद चौबे यांनी सांगितले. यापूर्वी लोकसभा निवडणुकीसदंर्भात मागितलेली माहिती राज्य माहिती आयुक्तांच्या आदेशानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे उपलब्ध झाली होती.(स्थानिक प्रतिनिधी)