आदेशानंतरही माहिती अप्राप्तच
By Admin | Updated: October 29, 2014 22:54 IST2014-10-29T22:54:16+5:302014-10-29T22:54:16+5:30
कंत्राटांबाबत माहिती मिळावी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागात आरटीआय अंतर्गत अर्ज करण्यात आला़ ४० दिवसांत माहिती न दिल्याने प्रथम अपिल दाखल केले़ यात सात दिवसांत माहिती देण्याचा आदेश होता;

आदेशानंतरही माहिती अप्राप्तच
बांधकाम विभागाचा प्रताप : सात दिवसांत माहितीचे पत्रही उशिरानेच
वर्धा : कंत्राटांबाबत माहिती मिळावी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागात आरटीआय अंतर्गत अर्ज करण्यात आला़ ४० दिवसांत माहिती न दिल्याने प्रथम अपिल दाखल केले़ यात सात दिवसांत माहिती देण्याचा आदेश होता; पण याबाबतचे पत्रच तब्बल नऊ दिवस उशीरा कार्यालयाने पोस्ट केले़ या आदेशाला २७ दिवस लोटले; पण माहिती देण्यात आली नाही़
२०१३-१४ दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाला किती निधी उपलब्ध झाला, किती खर्च झाला, यातून किती कामे करण्यात आली, संबंधित कंत्राट कुणाला देण्यात आले याबाबतची माहिती मिळावी म्हणून आरटीआय कार्यकर्ते ताराचंद चौबे यांनी अर्ज दाखल केला़ ६ आॅगस्ट रोजीच्या अर्जावर ४० दिवसांत माहिती मिळाली नाही़ यामुळे त्यांनी १७ सप्टेंबर रोजी अपिल दाखल केले़ यावर २६ व ३० सप्टेंबरला कार्यकारी अभियंता यांनी सुनावणी घेतली़ यात सात दिवसांत माहिती देण्याचे आदेश दिले़ यानंतर १३ आॅक्टोबर रोजी तत्सम पत्र तयार करण्यात आले; पण ते दि़ २२ रोजी चौबे यांना पाठविण्यास्तव रजीस्टर केले़ यामुळे आदेशातील सात दिवस कधी संपणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे़ आदेशानंतरही माहिती मिळत नसल्याने बांधकाम विभाग माहिती अधिकार कायद्याची अवहेलना करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे़ या प्रकरणी कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे़(कार्यालय प्रतिनिधी)