रेल्वेस्थानक फलकावरील आश्रम स्थापनेची माहिती चुकीची
By Admin | Updated: September 2, 2014 23:58 IST2014-09-02T23:58:14+5:302014-09-02T23:58:14+5:30
वर्धा रेल्वे स्थानकावर १९३४ मध्ये जमनालाल बजाज यांनी दान केलेल्या शेगाव येथील भूमीवर आश्रम स्थापन केल्याची नोंद आहे. या फलकावरील माहिती चुकीची आहे़ यातून महात्मा गांधी व त्यांच्या

रेल्वेस्थानक फलकावरील आश्रम स्थापनेची माहिती चुकीची
सेवाग्राम : वर्धा रेल्वे स्थानकावर १९३४ मध्ये जमनालाल बजाज यांनी दान केलेल्या शेगाव येथील भूमीवर आश्रम स्थापन केल्याची नोंद आहे. या फलकावरील माहिती चुकीची आहे़ यातून महात्मा गांधी व त्यांच्या सेवाग्राम आश्रमाबाबत लोकांपर्यंत चुकीचा संदेश पोहोचत असल्याचे दिसते़ यात सुधारणा करणे गरजेचे झाले आहे़
महात्मा गांधी यांचे शेगाव या गावी १९३६ मध्ये आगमन झाले. या गावाची कल्पना वा येथे येण्याचा गांधीजींचा विचार नव्हता. बापू वर्धेला आपल्या निवडक कार्यकर्त्यांसह आले होते. यात मीरा बहन यांचाही समावेश होता. मीरा बहन यांना खेड्याचे आकर्षन व ग्रामीण महिलांसाठी कार्य करण्याची उत्सुकता होती. यामुळे त्या शेगाव या गावी येऊन राहिल्या़ त्या आजारी पडल्याने त्यांना भेटण्यासाठी बापू आले व बजाज यांच्या पेरूच्या बगीच्यात थांबले. गावात सभा झाली़ येथे येऊन राहण्याची व कार्य करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. यात बुढा पटेल (गणपतराव चव्हाण) यांनी आपण येथे राहून कार्य करणार, यात आम्हाला आनंद आहे, असे सांगितले. बजाज यांनी आश्रमासाठी एक एकर जमीन दिली़
१९३४ मध्ये जमीन दान दिल्याचा पुरावा वा स्पष्टता दिसून येत नाही. बापूंचे सहकारी बलवंत सिंह यांचे ‘बापूकी छाया’ पुस्तक आहे. यात त्यांनी ‘बापूजी शेगाव या गावी आले. ज्या ठिकानावर आता आश्रम आहे, तेथे जमनालाल बजाज यांची शेती होती. त्यातील एक एकर जमीन त्यांनी आश्रमसाठी दिली होती. आदी निवास बनविण्याची जबाबदारी मीरा बहन व माझ्यावर होती, असे नमूद केले़ सेवाग्राम आश्रमातील आद्यनिवास फलकावर ३० एप्रिल १९३६ मध्ये सर्वप्रथम गांधीजी शेगाव येथे आले. पेरूच्या बगिचा व विहिरीजवळ थांबले. त्या ठिकाणी एक साधी झोपडी बनविण्यात आली होती. गावातील लोकांना भेटले. येण्याचा उद्देश त्यांना सांगून चर्चा केली. ५ मे १९३६ रोजी खादी यात्रेला ते रवाना झाले. १६ जून १९३६ मध्ये परत ते सेवाग्राम येथे येऊन राहू लागले.
‘पुण्यधाम सेवाग्राम’ हे प्रेमा कंटक यांचे हिंदी पुस्तक आहे़ यात शेगावमध्ये जमनालाल बजाज यांची शेती होती. यातील एक एकर जमीन गांधीजींनी आश्रमच्या उपयोगासाठी घेतली. यावर आश्रमच्या विविध झोपड्यांचे निर्माण कार्य झाले, असे नमूद आहे़ या दोन पुस्तकांतील महितीवरून १९३४ ऐवजी १९३६ मध्ये जमीन दिल्याचे स्पष्ट होते. गांधी सेवा संघाचे अध्यक्ष कनकमल गांधी यांच्या मते आश्रमसाठी जमीन १९३६ मध्ये देण्यात आली़ वर्धा रेल्वे स्थानकावर नोंद चुकीची आहे़ यात दुरुस्ती होणे गरजेचे आहे, असेही त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले़(वार्ताहर)