स्थलांतरीत पक्षांचे आगमन मंदावले
By Admin | Updated: February 7, 2015 01:22 IST2015-02-07T01:22:34+5:302015-02-07T01:22:34+5:30
जिल्ह्यात मान्सूनच्या आगमनानंतर व हिवाळ्यात स्थलांतरीत पक्षांचे आगमन होते. गत काही वर्षात या पक्षांचे आगमन मंदावले आहे.

स्थलांतरीत पक्षांचे आगमन मंदावले
श्रेया केने वर्धा
जिल्ह्यात मान्सूनच्या आगमनानंतर व हिवाळ्यात स्थलांतरीत पक्षांचे आगमन होते. गत काही वर्षात या पक्षांचे आगमन मंदावले आहे. जिल्ह्यात पक्षांचा अधिवास धोक्यात आला असून त्याला वनविभागाचे उदासीन धोरणही कारणीभूत ठरत आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच पक्षीगणना करण्यात आली असल्याने पक्षांच्या स्थलांतराणाचा मुद्दा चर्चेत आला आहे.
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी व जिल्हा वनसंरक्षक कार्यालय यांच्यावतीने जिल्ह्यातील पक्षांची गणना करण्यात आली. यावेळी पक्षी अभ्यासकांचे सहकार्य घेण्यात आले. वनविभागाने केलेल्या नोंदी तसेच पक्षी अभ्यासकांच्या नोंदीवरून पक्षांची प्रगणना होत असे, जिल्ह्यामतील काही प्रमुख पाणवठे, मदन उन्नई प्रकल्प, बोर प्रकल्प, जंगलाचा भाग येथे स्थलांतरीत पक्ष्यांचे आगमन होते. मुख्यत: मान्सून व हिवाळ्यात पक्षांचे आगमन होते. गत काही वर्षांपासून नियमित स्थलांतरीत होणाऱ्या पक्षांचे आगमनच होत नसल्याची बाब नोंदीतून समोर आली आहे. पक्षी अभ्यासकांच्या मते, सुमारे १५ ते २० वर्षांपूर्वी माळढोक पक्षी येत असत; मात्र माळरान संपुष्टात आल्याने या पक्षाचे आगमनच नाही. पक्षात पॉण्डस बर्ड, इंटरस्टेट, लोकल असे प्रकार असतात, जिल्ह्यात लोकल आणि पॉण्डस बर्डचे स्थलांतरण अधिक आहेत. प्रामुख्याने करकोचा, बदक, तांबट, घुबड, पिंगळा, शिकरा यांचा समावेश आहे.
जैवविविधता समिती नाममात्र
जिल्हास्तरावर जैवविविधता समिती गठित केली जाते. पक्षी हा विषय या अंतर्गत हाताळण्यात येतो. याशिवाय जिल्ह्यात आढळणाऱ्या जैवविविधतेचा विचार यात केला जातो. जैवविविधतेच्या रक्षणार्थ करावयाच्या उपाययोजना, नोंदी, संवर्धन याबाबी समाविष्ट आहेत. जिल्ह्यात मात्र समिती गठीत करण्यापलीकडे मजल गेली नाही. वनविभागानेही जिल्ह्याचा आराखडा तयार केलेला नाही. जैवविविधतेबाबत सजगता दाखविण्यात येत नसल्याचे यावरून दिसते.
शेतकऱ्यांमध्ये जागृतीची गरज
पक्षी हे शेतकऱ्यांचे मित्र आहेत. निसर्गाचा समतोल राखण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पक्षी करीत असले तरी पक्ष्यांमुळे पिकाची नासाडी होते हा गैरसमज बळावत आहेत. परिणामी शॉक लावून किंवा जाळ्यांचा वापर करून पक्ष्यांना मारण्यात येत आहे. प्रत्यक्षात पक्षी पिकांवरील किडे, अळ्या फस्त करून शेतकऱ्यांना अप्रत्यक्ष सहाय्य करतात. याबाबत जागृती केल्यास पक्षांच्या शिकारीचे प्रमाण कमी होईल. कृषी विभागाकडून त्यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती पक्षी अभ्यासक प्रभाकर पुसदकर यांनी ‘लोकमत’ला दिली.
पक्षांचा अधिवास धोक्यात
पक्षांचा अधिवास (हॅबीटर) मानवी हस्तक्षेपामुळे बऱ्याच प्रमाणात धोक्यात आला आहे. शिवाय ग्लोबल वॉर्मिंगमुळे अधिवास नष्ट होवू लागले आहे. पक्षांना जिथे खाद्य मिळते आणि अंडी घालण्यासाठी सुरक्षित जागा असते. त्याला अधिवास असे म्हणतात.
शेतीत मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर केला जात आहे. कीटक नाशकांचा फवारणीमुळे विषारी द्रव्य नदीच्या प्रवाहात मिसळतात. धरणाच्या बॅकवाटरमध्ये असेच प्रदुषण झाल्याने पक्षांचे खाद्य नष्ट झाले.