शेतकरी संकटात : तिबार पेरणीचा भुर्दंडघोराड : पावसाचे आगमन होण्यापूर्वी पेरलेली कपाशी सद्यस्थितीत बऱ्यापैकी आहे; पण स्प्रिंकलरच्या साह्याने जगवलेल्या कपाशीवर आता सततच्या पावसामुळे ‘मर’ रोगाचे सावट पसरले आहे़ या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली असून कपाशीच्या तिबार पेरणीचा भुर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागणार आहे़ कपाशीवर मर रोग आल्याने आर्थिक फटका बसला आहे़रोहिणी, मृग, आर्द्रा नक्षत्र कोरडे गेले अन् पुर्नवसू नक्षत्रात सुरू झालेल्या संततधार पावसाने पुन्हा शेतीच्या कामात खोळंबा आणला़ यामुळे खरीप हंगामच धोक्यात आला आहे. पुर्नवसूच्या उत्तरार्धात सुरू झालेला संततधार पाऊस पुष्प नक्षत्राच्या पुर्वार्धात जोमाने सुरू आहे. आठ दिवस लागून पडलेल्या पावसात दोन दिवस उसंत मिळाली़ या दिवसांत काही शेतकऱ्यांनी कपाशी व सोयाबीनची दुबार पेरणी केली; पण अपेक्षेपेक्षा अधिक पाऊस झाल्याने सोयबीनच्या पेरण्या उलटत असून कपाशीच्या बियाण्याला फुटलेले अंकूर पिवळे पडले आहेत़ श्रावण मासात हिरवा शालू परिधान करणारी शेतमाऊली यावेळी प्रतिक्षेतच आहे. उन्हाळ्याच्या मे महिन्याच्या शेवटास लावलेली कपाशी थोड्याफार प्रमाणात टिकाव धरून असली तरी ज्या शेतकऱ्याजवळ ओलिताचे साधन नाही, अशा शेतकऱ्यांच्या शेतात अद्याप पेरणी झाली नाही.रविवारपासून श्रावण महिना सुरू झाला आहे़ या महिन्यात सतत पाऊस असतो, हा अनुभव पाहता यंदाचा खरीप हंगाम धोक्यात सापडल्याचे चित्र आहे. आधी पावसाने मारलेली दडी आणि आला संततधार, अशा द्विधा मन:स्थितीत सापडलेल्या शेतकऱ्यांना पेरणी कधी करावी, ही चिंता आहे.(वार्ताहर)
अंकुरलेल्या कपाशीवर ‘मर’ रोगाचा प्रादुर्भाव
By admin | Updated: July 29, 2014 23:57 IST