कोरोनायनातही महागाईने तेल ओतले; घरातले बजेट बिघडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 05:00 IST2021-09-08T05:00:00+5:302021-09-08T05:00:07+5:30
जीवनावश्यक वस्तू असलेल्या खाद्यतेलाच्या दरावर पडला असून खाद्यतेलाच्या दरवाढीमुळे गृहिणींचे बजेटच बिघडले आहे. जिल्ह्यासह देशात कोविड-१९ विषाणूची एंट्री झाल्यापासून जीवनावश्यक वस्तूच्या दरातही बऱ्यापैकी वाढ झाली आहे. यात घरगुती गॅस सिलिंडर, पेट्रोल-डिझेल यासह खाद्यतेलाचा समावेश आहे. सोयाबीन हे खाद्य तेल आता १६० रुपयांवर पोहोचले आहे.

कोरोनायनातही महागाईने तेल ओतले; घरातले बजेट बिघडले!
विनोद घोडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोना संकटाच्या काळात जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनदरम्यान अनेकांचे रोजगार हिरावले गेल्याचे वास्तव असतानाच पेट्रोल व डिझेलच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. याचाच परिणाम जीवनावश्यक वस्तू असलेल्या खाद्यतेलाच्या दरावर पडला असून खाद्यतेलाच्या दरवाढीमुळे गृहिणींचे बजेटच बिघडले आहे. जिल्ह्यासह देशात कोविड-१९ विषाणूची एंट्री झाल्यापासून जीवनावश्यक वस्तूच्या दरातही बऱ्यापैकी वाढ झाली आहे. यात घरगुती गॅस सिलिंडर, पेट्रोल-डिझेल यासह खाद्यतेलाचा समावेश आहे. सोयाबीन हे खाद्य तेल आता १६० रुपयांवर पोहोचले आहे.
डाळीशिवाय वरण
पोषण आहार म्हणून रोजच्या जेवणात वरणाचा समावेश असतो. लहान मुलांसह घरातील प्रत्येक व्यक्तीने वरणाचे सेवन नेहमीच करावे असा सल्ला दिल्या जातो, पण वाढत्या महागाईमुळे डाळीशीवाय वरण कसे करावे, असा प्रश्न गृहिणींना पडला आहे.
सिलिंडर हजाराच्या घरात
हल्ली घरगुती गॅस सिलिंडरचे दर गगनालाच भिडले आहेत. जानेवारी महिन्यात ७४६ रुपयांत मिळणारे घरगुती गॅस सिलिंडरचे दर सध्या ९४५ रुपयांवर पोहोचले आहे. यामुळे सर्वसामान्य व्यक्तींना चांगलाच आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
गृहिणीं म्हणतात...
कोरोनायनात बऱ्याच लोकांचे रोजगार हिरावले. कसाबसा रोजगार मिळवित कुटुंबाचा गाडा हाकणे सुरू आहे. मात्र, आता यावर महागाई आपली वक्रदृष्टी टाकत आहे. त्यामुळे आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
- सुगंधा डायरे, गृहिणी.
हल्ली महागाईने सर्वसामान्य लोकांचे कंबरडे मोडले आहे. गॅस सिलिंडर, खाद्यतेलासह सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती दीड पटीने वाढल्या आहेत. जिभेचे लाड थांबविता येतील, पण पोटाची भूक नाही थांबत नाहे ना!
- वेणू बहादूरे, गृहिणी.