कपाशीवर मर रोगाचा प्रादुर्भाव
By Admin | Updated: September 15, 2014 00:18 IST2014-09-15T00:18:52+5:302014-09-15T00:18:52+5:30
जिल्ह्यासह परिसरात झालेल्या संततधार पावसाने वाळत चालेल्या पिकांना नवसंजीवनी दिली असली तरी काही दिवसांपासून पिकांवर मर रोगाचा प्रादुर्भाव पहावयास मिळत आहे. त्यामुळे पिके

कपाशीवर मर रोगाचा प्रादुर्भाव
खुबगाव : जिल्ह्यासह परिसरात झालेल्या संततधार पावसाने वाळत चालेल्या पिकांना नवसंजीवनी दिली असली तरी काही दिवसांपासून पिकांवर मर रोगाचा प्रादुर्भाव पहावयास मिळत आहे. त्यामुळे पिके वाळत असल्याचे दिसत आहे. अचानकपणे आलेल्या कपाशीवरील मर रोगामुळे शेतकरी हतबल झाला असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसत आहे.
मागील आठवड्यात चार दिवस सततच्या पावसाने शेतात पाणी साचले. तसेच ढगाळ वातावरणामुळे पिकाला पोषक वातावरण मिळाले नाही. या कारणाने पाऊस थांबताच कपाशी पिकावर मर रोगाचे आक्रमण झाले. यामुळे झाडे कोमेजून वाळण्यास सुरुवात झाली. अचानक आलेल्या रोगामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी झाडांच्या बुडाशी औषधाची फवारणी करुन पीक वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु पीक वाळत असल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. या रोगाविषयी शेतकऱ्यांना माहिती असल्यामुळे आणि उभे पीक अचानक पणे कोमेजून वाळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही अपवाद वगळता कपाशीच्या सर्वच वाणावर हा रोग आढळून येत आहेत.
कपाशीचे पीक सध्या फुलांवर असून चांगल्या स्थितीत आहे. परंतु मर रोगाच्या आक्रमणाने हातातोंडाशी आलेला घास पुन्हा मातीत जाण्याची चिन्हे दिसत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. खुबगाव, बाजारवाडा, नांदोरा, चोंदी हाशीमपूर मौजासह परिसरात मर रोगाचे प्रमाण कमी-अधिक असून शेतकरी संभ्रमात आहेत. कृषी विभागाकडून याबाबत कोणतेही मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळाले नसल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहे.(वार्ताहर)