महाविद्यालयाच्या स्वच्छतागृहात आढळले अर्भक
By Admin | Updated: December 30, 2014 23:40 IST2014-12-30T23:40:39+5:302014-12-30T23:40:39+5:30
येथील यशवंत महाविद्यालयात विद्यार्थिनींकरिता असलेल्या स्वच्छतागृहात अर्भक आढळल्याने चांगलीच खळबळ माजली. ही घटना मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास उघड झाली.

महाविद्यालयाच्या स्वच्छतागृहात आढळले अर्भक
वर्धा : येथील यशवंत महाविद्यालयात विद्यार्थिनींकरिता असलेल्या स्वच्छतागृहात अर्भक आढळल्याने चांगलीच खळबळ माजली. ही घटना मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास उघड झाली. मृतावस्थेत असलेले हे अर्भक सेवाग्राम रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.
महाविद्यालयातील एक विद्यार्थिनी सकाळी ११ वाजताच्या सुमारास स्वच्छतागृहात गेली असता तिला अर्भक रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याचे दिसून आले. हे अर्भक दिसताच सदर तरुणी आरडा ओरड करीत बाहेर आली.
तिने लगेच याची माहिती महाविद्यालयात उपस्थित असलेल्या प्राध्यापकाला दिली. सदर प्राध्यापकाने एका महिला प्राध्यापकाला याची माहिती दिली. महिला प्राध्यापिकेने स्वच्छतागृहात जावून पाहणी केली असता तिला अर्भक पडून असल्याचे दिसून आले. याची माहिती महाविद्यालयाच्यावतीने शहर पोलिसांना देण्यात आली.
माहिती मिळताच शहर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दोंदे यांच्या मार्गदर्शनात पथक महाविद्यालयात दाखल झाले. या पथकाने पंचनाम करून सदर अर्भक सेवाग्राम रुग्णालयात पाठविले. सदर अर्भक मृतावस्थेत असून त्याचे वय पाच ते सहा महिने असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी अज्ञात महिलेविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. या घटनेने महाविद्यालय परिसरात एकच खळबळ उडाली असून महाविद्यालय व्यवस्थापनही चिंतेत आहे. (प्रतिनिधी)