३०० शेतकऱ्यांच्या सहभागातून तरूणांनी साकारला उद्योग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 23:45 IST2017-12-16T23:43:51+5:302017-12-16T23:45:26+5:30
शेती व्यवसाय कमी खर्चात अधिक उत्पादनाचा करण्याच्या दृष्टीकोनातून घोराड येथील तरूणांनी एकत्र येऊन अॅग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली. त्या माध्यमातून ३०० शेतकऱ्यांच्या सहभागातून त्यांनी कृषी व्यवसायातून उन्नतीचा मार्ग शोधला.

३०० शेतकऱ्यांच्या सहभागातून तरूणांनी साकारला उद्योग
लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : शेती व्यवसाय कमी खर्चात अधिक उत्पादनाचा करण्याच्या दृष्टीकोनातून घोराड येथील तरूणांनी एकत्र येऊन अॅग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली. त्या माध्यमातून ३०० शेतकऱ्यांच्या सहभागातून त्यांनी कृषी व्यवसायातून उन्नतीचा मार्ग शोधला. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी या उद्योगाला भेट देवून या तरूणांचे कौतुक केले आहे.
महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पामार्फत (आत्मा) २६ डिसेंबर २०१६ ला केजाजी अॅग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना करण्यात आली. कृषी पदवीका व कृषी डिप्लोमा धारक युवक एकत्रित आले. यामध्ये ३०० शेतकरी सहभागी झाले. त्यांच्या एकजुटीने १० आर. शेती २५ वर्षांच्या लिजवर घेऊन येथे सामूहिक उद्योग उभा करण्यात आला. सामूहिक धान्य साफसफाई, प्रतवारी केंद्र सुरू केले. कमी दरात शेतकºयांना कृषी अवजारे उपलब्ध करून देणे, कृषी केंद्र सुरू करून रासायनिक खत, बियाणे, स्वस्त दरात पुरविणे, अमोनिया अॅसीड तयार करून शेतकऱ्यांना स्वस्तात उपलब्ध करून देणे आदी उपक्रम या कंपनीच्या माध्यमातून सुरू करण्यात आले. शेतकरी ते ग्राहक धान्य विक्री करून अधिक लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या युवकांना शेतकºयांची मिळालेली साथ व कंपनीच्या एक वर्षांच्या वाटचालीनंतर आता व्यवसायाच्या माध्यमातून थेट लाभ शेतकऱ्यांना मिळावा म्हणून धान्य विक्रीलाही सुरूवात करण्यात येणार आहे. सामूहिक रेशीम उद्योग, शेतमाल उत्पादीत उद्योगाला गुरुवारी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, तहसीलदार महेंद्र सोनवणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, तालुका कृषी अधिकारी बाबुराव वाघमारे आदींनी भेट देवून तरूणांच्या या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी तरुणांचे कौतुक केले. यावेळी अॅग्रो प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष विवेक माहुरे, सचिन शैलेश राऊत व संचालक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. या उद्योग समुहाच्यावतीने वर्धा रेल्वे स्टेशनवरील मॉलमध्ये व सेवाग्राम येथील डॉक्टर कॉलनी आणि गिताई मंदिर परिसरात आठवडी बाजार लावून थेट शेतकरी ते ग्राहक अशी धान्यविक्री करण्यात येणार आहे. नवीन वर्षांत उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती उद्योग समुहातर्फे देण्यात आली आहे.