एमआयडीसीतील निम्म्यावर उद्योग बंद
By Admin | Updated: August 13, 2016 00:36 IST2016-08-13T00:36:37+5:302016-08-13T00:36:37+5:30
औद्योगिक विकासाशिवाय प्रगती नाही, असे म्हणत राज्य, केंद्र शासनाकडून अनेक सुविधा पुरविल्या जातात.

एमआयडीसीतील निम्म्यावर उद्योग बंद
भूखंड लाटण्यातच धन्यता : पाच एमआयडीसी तरीही रोजगाराची संधी शून्य
प्रशांत हेलोंडे वर्धा
औद्योगिक विकासाशिवाय प्रगती नाही, असे म्हणत राज्य, केंद्र शासनाकडून अनेक सुविधा पुरविल्या जातात. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळालाही शासनाकडून सवलती, अनुदान देत उद्योग उभारणीला चालना देण्याचा प्रयत्न केला जातो; पण तुलनेत रोजगार संधी उपलब्ध होत नाही, हे वास्तव आहे. वर्धा जिल्ह्यात पाच औद्योगिक क्षेत्र आहेत. यातील जवळपास सर्वच भूखंड वितरित करण्यात आले असले तरी उद्योग मात्र बोटावर मोजण्याइतकेच सुरू आहेत. यामुळे देवळी वगळता चारही एमआयडीसींतून रोजगार निर्मिती शून्यच असल्याचे दिसते.
वर्धा जिल्ह्यात वर्धा, देवळी, हिंगणघाट, समुद्रपूर आणि कारंजा येथे म.रा. औद्योगिक विकास महामंडळाचे क्षेत्र आहे. यातील हिंगणघाट, समुद्रपूर आणि कारंजा (घा.) हे लघु औद्योगिक क्षेत्रामध्ये मोडते. वर्धा एमआयडीसीचे क्षेत्र ३१२.१९ हेक्टरमध्ये विस्तारलेले आहे. यात एकूण ४९१ भूखंड पाडण्यात आले असून ४५४ भूखंडांचे वाटप करण्यात आलेले आहे. ३७ भूखंड शिल्लक असून यातील १६ औद्योगिक, १६ व्यापारी आणि ५ निवासी असे वर्गिकृत करण्यात आलेले आहे. वर्धा एमआयडीसीमध्ये ३४२ भूखंडांवर उद्योग स्थापन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राकडून देण्यात आली. असे असले तरी बहुतांश उद्योग बंद पडलेले आहेत. बहुतांश भूखंड भंगार विक्रेत्यांनी घेतले असून काही भूखंडांवर अद्याप कुठल्याही उद्योगांचा विकास करण्यात आला नसल्याचे दिसून आले. कित्येक वर्षांपूर्वी आवंटित करण्यात आलेल्या भूखंडांवर केवळ शासनाचे अनुदान लाटण्यापूरतेच उभारण्यात आल्याचे दिसून आले. पाच वर्षेपर्यंत उद्योग चालवायचा, शासनाचे अनुदान लाटायचे आणि नंतर उद्योग बंद करून भूखंड जैसे थे ठेवायचा, असाच प्रकार जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रामध्ये दिसून येतो. वर्धा एमआयडीसी परिसरातील किती उद्योग सुरू आणि किती बंद, ही माहितीही जिल्हा उद्योग केंद्राकडे नसल्याचे आढळून आले.
वर्धेच्या तुलनेत नव्याने स्थापन झालेल्या देवळी येथील औद्योगिक क्षेत्रात बऱ्यापैकी उद्योग विसावले आहेत. यातील सर्वच उद्योग सुरू असून रोजगाराची संधीही काही प्रमाणात उपलब्ध झाली आहे.
देवळी एमआयडीसी २५८.६० हेक्टरमध्ये विस्तारली आहे. यात भूखंड १०१ पाडले असून ९५ प्लॉटचे वाटप झाले आहे. ६ भूखंड शिल्लक असून दोन औद्योगिक, एक व्यापारी आणि तीन निवासी, असे वर्गिकरण करण्यात आले आहे. देवळी एमआयडसीमध्ये गॅमन इंडिया, विल्स इंडिया, महालक्ष्मी टीएमटी यासह अन्य उद्योग स्थापित झाले आहेत. या उद्योगांमध्ये जिल्ह्यातील बेरोजगारांना बऱ्यापैकी रोजगार संधी उपलब्ध झाली आहे. या औद्योगिक क्षेत्रात मोठी जागा पॉवरग्रीडने व्यापली आहे. उच्च विद्युत दाबाच्या टॉवर व लाईनमुळे देवळी शहरासह औद्योगिक परिसरही व्यापल्याचे दिसते.
हिंगणघाट येथील लघु औद्योगिक क्षेत्र १०.३० हेक्टरमध्ये विस्तारलेले आहे. यात ५४ भूखंड पाडण्यात आले असून सर्व वितरित करण्यात आलेले आहेत. यातील बहुतांश भूखंडांवर उद्योग स्थापित झाले असून शहरासह परिसरातील ग्रामीण बेरोजगारांनाही रोजगार संधी उपलब्ध झाली आहे. समुद्रपूर येथील लघु औद्योगिक क्षेत्र १५.५७ हेक्टरमध्ये विस्तारले आहे. यात ३५ भूखंड पाडले असून २९ चे वितरण करण्यात आले आहेत. ६ भूखंड व्यापारी वापराकरिता राखीव ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. कारंजा येथील लघु औद्योगिक क्षेत्र ११.७० हेक्टरमध्ये विस्तारले आहे. येथे ५४ भूखंड असून सर्वांचे वितरण करण्यात आले आहे. या तीनही लघु औद्योगिक क्षेत्रातील अर्धेधिक उद्योग बंद असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे विशेष रोजगार संधी उपलब्ध होत नसल्याचेच दिसते. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळांतर्गत जमीन प्रात्य करायची, शासकीय अनुदान लाटण्यासाठी उद्योग स्थापन करायचा आणि पाच वर्षांनी तो बंद करायचा, असाच प्रकार सर्वत्र आहे. औद्योगिक क्षेत्र व बाहेरील अशी ३१ प्रकरणे जिल्हा उद्योग केंद्राकडे आहे. हे सर्व उद्योग शासन अनुदान लाटल्यानंतर बंद झाल्याचे डीआयसीच्या अहवालात नमुद आहे.
एमआयडीसीची स्थिती
वर्धा - क्षेत्र ३१२.१९ हेक्टर.
भूखंड-४९१, वाटप-४५४,
शिल्लक- ३७, औद्योगिक-१६ व्यापारी- १६, निवासी - ५
देवळी - २५८.६० हेक्टर.
भूखंड - १०१, वाटप - ९५,
शिल्लक - ६, औद्योगिक -२, व्यापारी- १, निवासी- ३
हिंगणघाट - १०.३० हेक्टर.
भूखंड - ४५, वाटप - ४५,
समुद्रपूर - १५.५७ हेक्टर.
भूखंड - ३५, वाटप - २९,
शिल्लक - ६(सर्व व्यापारी)
कारंजा - ११.७० हेक्टर.
भूखंड-५४, वाटप-५४