इंदिरा गांधी उड्डानपूल धोक्याचा
By Admin | Updated: April 23, 2016 02:15 IST2016-04-23T02:15:24+5:302016-04-23T02:15:24+5:30
वर्धा, बरबडी, सेवाग्राम, हिंगणघाट या मार्गांना जोडणाऱ्या इंदिरा गांधी उड्डानपुलाची अत्यंत दुरवस्था झाली आहे.

इंदिरा गांधी उड्डानपूल धोक्याचा
दुरुस्तीकडे दुर्लक्ष : पादचारी मार्ग उखडला; अपघाताचा धोका
सेवाग्राम : वर्धा, बरबडी, सेवाग्राम, हिंगणघाट या मार्गांना जोडणाऱ्या इंदिरा गांधी उड्डानपुलाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. मात्र या पुलाची डागडुजी करण्यात येत नसून पुलाच्या देखभालीकडे संबंधीत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या पुलावर खड्डे पडले आहे. याची डागडुजी केल्यावर खड्डे जैसे थे झाल्याने वाहन चालकांना येथून रस्ता काढताना चांगलीच कसरत करावी लागते.
महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाचा परिसर तसेच सेवाग्राम रुग्णालय, आश्रम, हिंगणघाट तसेच परिसरातील गावांना या पुलाने जोडले आहे. हा रस्ता पुढे धोत्रा चौफुलीजवळ जोडल्या जातो. त्यामुळे येथून जडवाहतूक होते. सेवाग्राम येथील रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या या पुलाला इंदिरा गांधी उड्डानपूल असे नाव देण्यात आले आहे. या पुलावरून तीन दिशने मार्ग जातात. रस्ते व पूल हे विकासाचे मुख्य साधन आहे. त्यामुळे विकासाला गतीमान करण्याचे काम केले जाते. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते.
इंदिरा गांधी उड्डानपुलामुळे वर्धा, सेवाग्राम, म्हसाळा व परिसरातील नागरिकांची सुविधा झाली. मात्र येथील पुलाची दैनावस्था झाल्याचे दिसून येत आहे. येथील लोकवस्ती वाढल्याने येथे गर्दी असते. येथून सर्व प्रकारची वाहने दिवसरात्र धावतात. सकाळी १० वाजता आणि सायंकाळला ५ ते ७ यावेळेत वाहनांची अधिक गर्दी होते. वाहतुकीच्या दृष्टीने हा पूल अत्यंत अरुंद ठरतो.
वैशाली नगर, धन्वंतरी नगर, महिलाश्रम, म्हसाळा या परिसरातील नागरिक या रस्त्याने फिरायला जातात. या पुलावर पहाटे व रात्रीला फिरायला येणाऱ्यांच्या संख्या अधिक आहे. मात्र पादचारी मार्गावर खोल खड्डे आहे. या खड्ड्यात अडखळून पडण्याचा धोका नागरिकांना असतो. येथील पथदिवे अनेकदा बंद असतात.
पुलावरील पादचारी मार्ग अनेक ठिकाणी तुटल्याने यावरुन चालावे कसे हा प्रश्न नागरिकांना पडतो. अशातच किरकोळ अपघात होण्याची शक्यता असते. संबंधीत विभागाकाडून याची डागडुजी करणे गरजेचे झाले आहे. येथील पुलावरील खड्डे दुरूस्ती करण्याची मागणी जोर धरत आहे.(वार्ताहर)