अट्टल दुचाकी चोर गजाआड
By Admin | Updated: June 10, 2016 02:07 IST2016-06-10T02:07:24+5:302016-06-10T02:07:24+5:30
संशयितरित्या दुचाकी चालवित असलेल्या एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली असता तो अट्टल दुचाकीचोर असल्याचे उघड झाले.

अट्टल दुचाकी चोर गजाआड
सहा दुचाकी जप्त : पुन्हा घटना उजेडात येणार
वर्धा : संशयितरित्या दुचाकी चालवित असलेल्या एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली असता तो अट्टल दुचाकीचोर असल्याचे उघड झाले. त्याच्याकडून सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या चोरट्याकडून आणखी दुचाकी जप्त होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
सावंगी पोलीस रात्र गस्तीवर असताना धुनिवाले मठ मार्गावर संजय धमाने यांच्या गॅरेज समोर एक इसम संशयितरित्या दुचाकी चालवित असल्याचे दिसून आले. त्याच्या वाहनावरील एम. एच.३२ एन. ९३९९ क्रमांक ट्रेस केला असता तो दुसऱ्या दुचाकीचा असल्याचे समोर आले. त्याला नाव विचारले असता त्याने सोनू उर्फ सनी सदन यादव (२४) रा. आदर्श नगर, सेवाग्राम असे सांगितले. त्याला पोलिसी हिसका दाखविताच त्याने सदर दुचाकी सावंगी रुग्णालयाच्या परिसरातून चोरून आणल्याचे सांगितले. त्याच्या जवळील दुचाकीचा इंजिन व चेचीस क्रमांक तपासला असता या संदर्भात भादंविच्या कलम ३७९ गुन्हा दाखल असल्याचे समोर आले. त्याला विचारणा केली असता त्याच्याकडून इतर दुचाकी मिळून आल्या. त्याने चोरी करून क्रमांक बदलवित विकलेल्या दुचाकी पोलिसांनी जप्त केल्याचे सांगण्यात आले आहे. त्याच्याकडून आणखी दुचाकी मिळण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे.
ही कारवाई सावंगी पोलीस ठाण्याचे निरीक्षक शेगावकर यांच्या मार्गदर्शनात जमादार रामदास बिसने, विकास अवचट, संघसेन कांबळे, नवनाथ मुंडे यांनी केली.(प्रतिनिधी)