कृषिपंपाचे दिले वाढीव देयक
By Admin | Updated: March 22, 2015 01:46 IST2015-03-22T01:46:35+5:302015-03-22T01:46:35+5:30
कृषिपंपाचे वीज मीटर बंद असतानाही नेहमीच्या आकारणीच्या चारपट आकारणी करून शेतकऱ्यांना देयक देण्यात आले आहे.

कृषिपंपाचे दिले वाढीव देयक
खरांगणा(मो.) : कृषिपंपाचे वीज मीटर बंद असतानाही नेहमीच्या आकारणीच्या चारपट आकारणी करून शेतकऱ्यांना देयक देण्यात आले आहे. वीज वितरण विभागातील मोरांगणा कार्यालयाच्या या प्रतापाने कृषी पंपधारक शेतकरी आश्चर्य व्यक्त करीत आहे.
या देयकात रक्कम वाढविली असल्याने आधीच दुष्काळात होरपळत असलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. शेतकऱ्यांना कृषीपंपाचे देयक देताना कोणती मार्गदर्शक तत्व अंमलात आणली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत वीज नियामक आयोगाच्या काय सूचना आहेत, यात किती टक्के देयक वाढविली पाहिजे याची विचारणा करण्याची मागणी वरिष्ठांकडे केली आहे.
याबाबत विभागाकडे ग्राहकांनी माहिती विचारल्यावरही योग्य माहिती दिल्या जात नाही. अधिकारी, कर्मचारी कार्यालयातच असताना अन्यत्र गेल्याचे सांगण्यात येवून दिशाभूल केली जाते. माहिती देण्यास टाळाटाळ केली जाते. परिणामी शेतकऱ्यांना कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. येथे सहायक अभियंता पद देण्यात यावे अशी मागणी आहे. मागील ३ ते ४ वर्षापासून या मागणीकडे दुर्लक्ष आहे.
येथील कार्यालयात गणक मीटरच उपलब्ध होत नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे एच.पी. प्रमाणे दररोज होणारा पाण्याचा उपसा व शेतीचा आकार या बाबी लक्षात घेऊन किमान वीज आकारणी करण्यात येते. परंतु या मार्गदर्शक तत्वाला फाटा देऊन वाढीव देयक देण्यात आले आहे. अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर सुलतानी संकट ओढवले आहे. वीज देयकाच्या रूपात चारपटीने दिलेला धक्क्यातून बळीराजाला सावरण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी आहे.(वार्ताहर)