बदलत्या ॠतूमानाने रुग्णसंख्येत वाढ
By Admin | Updated: August 11, 2016 00:33 IST2016-08-11T00:33:27+5:302016-08-11T00:33:27+5:30
पावसामुळे बदलते ॠतुमान, ठिकठिकाणी साचत असलेले सांडपाणी आणि अस्वच्छता यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्येत भरमसाठ वाढ झाली आहे.

बदलत्या ॠतूमानाने रुग्णसंख्येत वाढ
आजारांचे थैमान : जुलै महिन्याअखेर २९ हजारांवर रुग्णांची नोंद
वर्धा : पावसामुळे बदलते ॠतुमान, ठिकठिकाणी साचत असलेले सांडपाणी आणि अस्वच्छता यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्येत भरमसाठ वाढ झाली आहे. यात संसर्गजन्य व श्वसनाचे आजार सर्वाधिक आहे. जुलै महिन्यात २६ हजार ९८५ बाह्यरुग्णांची तर १ हजार ८३९ आंतररुग्णांची नोंद करण्यात आली. त्याचप्रमाणे १ ते १० आॅगस्ट दरम्यान १० हजार ६६१ बाह्यरुग्ण तर ३०० च्या वर आंतररुग्ण असल्याचे आढळून आले आहे.
सर्वाधिक आजार हे पाणी आणि दूषित हवेमुळे होतात. यामुळेच पावसाळा सुरू होताच जिल्ह्यात सर्वत्र आजारांमध्ये वाढ झाली आहे. यामध्ये दूषित पाण्यापासून होत असलेल्या डायरिया, गॅस्ट्रो आणि हवेमुळे पसरत असलेल्या सर्दी, खोकला आदी आजारांच्या रुग्णसंख्येत कमालीची वाढ झाली आहे. जिल्हा आरोग्य विभागाद्वारे या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी अनेक जनजागृतीपर उपक्रम राबविले जात आहेत. असे असले तरी रुग्णसंख्येत घट होत नसल्याचे वास्तव आहे. नागरिक स्वच्छतेबाबत अजूनही तितक्या प्रमाणात जागरुक नसल्याने रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे आरोग्य विभागाद्वारे सांगण्यात येते.
जुलै महिन्यात जिल्ह्यात एकूण २८ हजार ८२४ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यात २६ हजार ९८५ बाह्यरुग्ण तर १ हजार ८३९ आंतररुग्ण होते. आॅगस्ट महिन्यात आतापर्यंत आंतर व बाह्यरुग्ण मिळून जवळपास ११ हजार रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दररोज रुग्णांची वाढती गर्दी पाहता हा आकडा या महिन्यात आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.(शहर प्रतिनिधी)