पिपरी व १३ गावांसाठी वाढीव पाणीपुरवठा योजना
By Admin | Updated: May 3, 2017 00:35 IST2017-05-03T00:35:40+5:302017-05-03T00:35:40+5:30
पिपरी(मेघे) व १३ गावे वाढीव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या २७ कोटी ४४ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास व आराखड्यास राज्य

पिपरी व १३ गावांसाठी वाढीव पाणीपुरवठा योजना
२७.४४ कोटींचा खर्च : जीवन प्राधिकरण करणार काम
वर्धा : पिपरी(मेघे) व १३ गावे वाढीव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या २७ कोटी ४४ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास व आराखड्यास राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने शासन निर्णयाद्वारे मंजुरी प्रदान केली आहे. शहरासभोवताल झपाट्याने वाढणाऱ्या लोकवस्तीच्या गरजेनुसार पाणीपुरवठा उपलब्ध होण्याकरिता ही वाढीव योजना उपयोगी ठरणार आहे. तसे पत्र पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी मंगळवारी मुंबई येथे दिल्याची माहिती वर्धेचे आमदार डॉ. पंकज भोयर यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत या वाढीव योजनेचे काम होणार आहे. या मंजुरीमुळे पिपरी (मेघे), कारला, साटोडा, आलोडी, नालवाडी, दत्तपूर, मसाळा, उमरी(मेघे), सावंगी(मेघे), बोरगाव(मेघे) आणि वायगाव(नि.) या गावांसह सिंदी(मेघे), सालोड(हिरापूर) येथील नवीन वस्तींना वाढीव पाणीपुरवठा योजनेचा लाभ होणार आहे. या योजनेंतर्गत एकूण सात पाणीटाक्यांची निर्मिती केली जाणार आहे. उमरी(मेघे) व सिंदी(मेघे) या गावांकरिात ८ लाख लिटरची एकत्रित टाकी, पिपरी (मेघे) गावासाठी ३.५० लाख लिटरची टाकी, सावंगी(मेघे) करिता ९.५० लाख लिटरची टाकी, बोरगावसाठी २ लाख लिटर, आलोडा व साटोडासाठी ४ लाख लिटरची, नालवाडी व दत्तपुरसाठी एकत्रित ७.५० लाख लिटरची, वायगाव(नि.) साठी दोन लाख लिटरची टाकी बनविण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)
नव्या योजनेवर १५ हजार ५०० नळजोडण्या
या वाढीव योजनेंतर्गत संबंधित गावांना शुद्ध पाणी प्राप्त व्हावे, याकरिता पाणीनलिका अंथरण्यात येणार आहे. या १४ गावामध्ये २१० किलोमीटर लांबीची जलवाहिनी (पाईपलाईन ) अंथरण्यात येईल. सध्या जुन्या योजनेवर १५ हजार ५०० नळजोडण्या आहेत. नवीन वाढीव योजनेमुळे आणखी तीन ते चार हजार नळजोडण्या देणे शक्य होणार आहे. या १४ गावांची सन २०२७ मधील संभाव्य लोकसंख्या २ लाख ३९ हजार ३१९ गृहीत धरुन त्यानुसार या वाढीव योजनेचे कार्यान्वयन होणार आहे.
या वाढीव योजनेंतर्गत टाक्या जलदगतीने भरण्याकरिता ३०० बीएचपीचे मोटारपंप वापरले जाणार आहेत. या वाढीव योजनेतही नळजोडणी घेणाऱ्यांकडे मीटर बसविले जाणार असून, जितका पाण्याचा वापर, तितके देयक असणार आहे. यातुन पाणी बचतीविषयीही जागृती निर्माण होईल, असे आमदार डॉ. भोयर यांनी कळविले आहे. पिपरी (मेघे) व १३ गावे वाढीव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या अंदाजपत्रकास व आराखड्यात मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्तमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी मान्यता दिल्याचे आमदार डॉ. भोयर म्हणाले.
दोन वर्षांची मुदत
येत्या एक महिन्यात पिपरी(मेघे) व १३ वाढीव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कामाची निविदा निघणार असून, येत्या दोन वर्षांत ही योजना पूर्ण करायची आहे. या योजनेची अंमलबजावणी पूर्ण झाल्यावर किमान तीन वर्षे कंत्राटदाराला योजना चालविणे बंधनकारक करण्यात आले आहे. योजना यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे की नाही, याची खात्री जीवन प्राधिकरणाने करायची आहे. या योजनेचे कार्यान्वयन जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता पी.एस. वाघ यांच्या मार्गदर्शनात उपअभियंता व्ही.पी. उमाळे व शाखा अभियंता प्रदीप चवडे हे करणार आहेत.