शासनाकडून शेतकऱ्यांना वाढीव अनुदान
By Admin | Updated: January 19, 2017 00:18 IST2017-01-19T00:18:54+5:302017-01-19T00:18:54+5:30
शासनाकडून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. उत्पन्नातील घट

शासनाकडून शेतकऱ्यांना वाढीव अनुदान
सोयाबीन उत्पादकांना दिलासा : शेतकऱ्यांकडून प्रस्ताव अपेक्षित
हिंगणघाट : शासनाकडून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. उत्पन्नातील घट आणि अत्यल्प मिळालेल्या भावामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यामुळे शासनाने वाढीव अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शेतकऱ्यांना सोयाबीन विकलेल्या बाजार समितीमध्ये प्रस्ताव सादर करावयाचे आहेत. हे सोयाबीन अनुदान प्रती क्विंटल २०० रुपये प्रमाणे अधिकाधिक २५ क्विंटलपर्यंत देण्यात येणार आहे.
तीन महिन्यांच्या कालावधीत बाजार समितीमध्ये विकलेल्या सोयाबीनपोटी हे अनुदान देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी ज्या बाजार समितीमध्ये आपले सोयाबीन विकले, त्या बाजार समितीकडे शेतकऱ्यांना प्रस्ताव पाठवावे लागणार आहेत. यात २५ क्विंटलपर्यंत म्हणजेच ५ हजार रुपयांपर्यंत अनुदान प्राप्त होणार आहे.
हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत ज्या शेतकऱ्याने सोयाबीनची विक्री केली, अशा शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २०० व अधिकाधिक २५ क्विंटल प्रती शेतकरी हे अनुदान देण्यात येत आहे. हिंगणघाट बाजार समितीच्या आवारात तीन महिन्यांच्या कालावधीत सोयाबीनची विक्री केलेल्या शेतकऱ्यांनी विक्री पावती, चालू वर्षाचा सातबारा, राष्ट्रीयकृत बॅँक बचत खात्याची झेरॉक्स, आधार कार्ड व तलाठ्याचे सोयाबीनबाबत पेरापत्रक आदी कागदपत्रासह समितीच्या छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड येथे अनुदान मागणी प्रस्ताव सादर करावा. सदर प्रस्ताव पडताळणी करून उचित कार्यवाहीकरिता वरीष्ठ कार्यालयास सादर करण्यात येणार असल्याचे सभापती अॅड. सुधीर कोठारी यांनी जाहीर केले.
शेतकऱ्यांना सोयाबीन विक्री केलेल्या बाजार समित्यांमध्येही प्रस्ताव सादर करता येणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे काही प्रमाणात का होईना सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.(तालुका प्रतिनिधी)