गाफिल प्रशासनामुळे वाढतोय कोविड संसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 05:00 IST2020-08-26T05:00:00+5:302020-08-26T05:00:58+5:30
जिल्हा बंदी कायम असताना ई-पास आणि चोर वाटांचा अवलंब करून आतापर्यंत लाखाच्यावर व्यक्ती वर्धा जिल्ह्यात परतले आहेत. याच व्यक्तींपैकी बहूतांश व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग होऊन वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा स्प्रेड झाल्याचे आरोग्य विभागाच्या आतापर्यंतच्या पाहणीत पुढे आले आहे. विना परवानगी कुणी वर्धा जिल्ह्यात येऊ नये म्हणून जिल्ह्याच्या सीमांवर तात्पूत्या पोलीस चौकी तयार करण्यात आल्या आहेत.

गाफिल प्रशासनामुळे वाढतोय कोविड संसर्ग
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : लॉकडाऊन जाहीर झाल्यावर सुरूवातीचे ५० दिवस कोविड विषाणूची एन्ट्री न करू दिलेल्या वर्धा जिल्ह्यात सध्या कोरोना आपले पाळेमुळे घट्ट करू पाहत आहे. जिल्हा बंदी कायम असतानाही चोर वाटेने वर्धा जिल्ह्यात अनेक व्यक्ती येत असल्याने कोविडच्या स्प्रेडही वाढत आहे. सध्या कोविड बाधितांची संख्या सातशे पार झाली असून लवकरच हा आकडा हजारी पार करेल असे तज्ज्ञांकडून बोलले जात आहे. परिणामी, नागरिकांनीही आता जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.
जिल्हा बंदी कायम असताना ई-पास आणि चोर वाटांचा अवलंब करून आतापर्यंत लाखाच्यावर व्यक्ती वर्धा जिल्ह्यात परतले आहेत. याच व्यक्तींपैकी बहूतांश व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग होऊन वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा स्प्रेड झाल्याचे आरोग्य विभागाच्या आतापर्यंतच्या पाहणीत पुढे आले आहे. विना परवानगी कुणी वर्धा जिल्ह्यात येऊ नये म्हणून जिल्ह्याच्या सीमांवर तात्पूत्या पोलीस चौकी तयार करण्यात आल्या आहेत. याच ठिकाणी जिल्ह्यात येणाऱ्यांकडे सक्षम अधिकाऱ्यांकडून देण्यात येणारी ई-पास आहे काय याची तपासणी केली जाते.
परंतु, या मार्गाने न येता काही व्यक्ती चोरवाटेने वर्धा जिल्ह्यात प्रवेश करीत असल्याचेही कोविड योद्धा म्हणून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी नव्या जोमाने जिल्हाबंदीची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.
२२,५२३ व्यक्तीची चाचणी
ट्रेस, टेस्ट आणि ट्रिट या त्रिसुत्री संकल्पनेला केंद्रस्थानी ठेऊन आतापर्यंत जिल्ह्यात एकूण २२ हजार ५२३ व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आली आहे. यात जिल्ह्याबाहेरील व्यक्तींचाही समावेश असून त्यापैकी २१ हजार ४६० व्यक्ती अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर १ हजार १२० व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. त्यापैकी ७२२ कोविड बाधित व्यक्ती वर्धा जिल्ह्यातील असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
प्लाझ्मादानासाठी जनजागृती विशेष मोहीम गरजेची
कोरोनामुक्त झालेल्या १८ ते ६० वर्ष वयोगटातील आणि किमान ५५ किलो वजन असलेल्या पुरुषाला २८ दिवसानंतर किमान २०० तर जास्तीत जास्त ५०० एमएल प्लाझ्मादान करता येतो. व्हेंटिलेटरवर असलेल्या कोविड बाधितासाठी प्लाझ्मा थेरपी ही नवसंजीवनी ठरणारी असून प्लाझ्मादानाचे कुठलेही दुष्परिणाम नसल्याचे वैद्यकीय अधिकारी तसेच वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. भविष्यातील भयावह कोरोना संकट लक्षात घेऊन कोविडमुक्त झालेल्या व्यक्तींनी स्वत:हून पुढे येत प्लाझ्मादान करणे गरजेचे असून तसे आवाहनही सेवाग्राम येथील कस्तुरबा हेल्थ सोसायटीच्यावतीने करण्यात आले आहे. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाकडून प्लाझ्मादानाबाबत विशेष जनजागृती मोहीम जिल्ह्यात राबविण्याची गरज आहे.