मिनी अंगणवाडी सेविकेच्या मानधनात वाढ
By Admin | Updated: June 22, 2014 00:07 IST2014-06-22T00:07:00+5:302014-06-22T00:07:00+5:30
मिनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करावी या मागणीकरिता विविध संघटनांच्यावतीने आंदोललन करण्यात आले होते. या आंदोलनाला यश आले असून या सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात आल्याचा

मिनी अंगणवाडी सेविकेच्या मानधनात वाढ
वर्धा : मिनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करावी या मागणीकरिता विविध संघटनांच्यावतीने आंदोललन करण्यात आले होते. या आंदोलनाला यश आले असून या सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात आल्याचा निर्णय शासनाने नुकताच जाहीर केला आहे.
मिनी अंगणवाडी सेविकेच्या मानधनातील तफावत दुर करा, केंद्र शासनाने केलेली मानधन वाढ त्वरीत लागु करा, मिनी अंगणवाडी सेविकांना उन्हाळ्याच्या सुट्या लागु करा, मिनी अंगणवाडी केंद्रात ३०० लोकसंख्या व १५ लाभार्थी आहेत अशा केंद्राचे मोठ्या अंगणवाडीत रूपांतर करा आदी मागण्यासाठी आयटक प्रणित महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियनच्यावतीने १६ जून २०१४ रोजी मुुुबईच्या आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात आले.
या मागणीची दखल घेत मिनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात आली. मागण्यांचे निवेदन महिला व बालविकास मंत्री वर्षा गायकवाड यांना देण्यात आले होते. या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी महिला व बालविकास विभागाचे उपसचिव चव्हाण, हजारी तसेच उपयुक्त शिंदे उपस्थित होते. तर संघटनेच्या वतीने राज्यकार्याध्यक्ष दिलीप उटाने, राजश्री सेलार, मंगला इंगोले, शालिनी पवार, बी. के. जाधव यांची उपस्थिती होती.
यावेळी झालेल्या चर्चेत केंद्र शासनाने केलेल्या मानधनवाढीप्रमाणे मिनी अंगणवाडी सेविकांना मानधनवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. जुलै २०१३ पासून मानधनात ७५० रुपये वाढ करून थकबाकीसह मानधन देण्यात येईल. आता दरमहा मिनी अंगणवाडी सेविकांना दरमहा २ हजार ५०० रुपये ऐवजी तीन हजार २५० रुपये मानधन देण्यात येईल असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले. संघटनेच्या वतीने गायकवाड यांचे आभार व्यक्त करण्यात आले. या वाढीचा लाभ महाराष्ट्रातील ९८८० मिनी अंगणवाडी सेविकांना जुलै २०१३ पासून मिळेल. या आंदोलनात १५ जिल्ह्यातील सेविकांनी हजेरी लावली होती. तर वर्धा जिल्ह्यातील मंगला इंगोले यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येनी सहभाग घेतला होता. तुटपुंजा वेतनात काम करण्याऱ्या या मिनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ झाली असली तरी इतर मागण्यांडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.(शहर प्रतिनिधी)