लिक कालव्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ
By Admin | Updated: November 14, 2016 00:58 IST2016-11-14T00:58:46+5:302016-11-14T00:58:46+5:30
मदन उन्नई धरणाचा डावा व उजवा कालवा अनेक ठिकाणी फुटला आहे. यामुळे अनेकांच्या शेताला तळ्याचे स्वरूप आले आहे.

लिक कालव्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ
शेतकऱ्यांना फटका : कपाशी व अन्य पिके पिवळी पडल्याने नुकसानाची शक्यता
आकोली : मदन उन्नई धरणाचा डावा व उजवा कालवा अनेक ठिकाणी फुटला आहे. यामुळे अनेकांच्या शेताला तळ्याचे स्वरूप आले आहे. परिणामी, कपाशीसह तुरीच्या पिकावर विपरित परिणाम होत आहे. कालव्याच्या लिकेजमुळे शेतकऱ्यांच्या अडचणींत वाढ झाली आहे. याबाबत माहिती देऊनही संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.
मदन उन्नई धरणाचा परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी फायदा होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षी कारभाराचा सध्या या भागातील शेतकऱ्यांना फटका सहन करावा लागत आहे. या भागात धड मजबुत पाटचऱ्या नाही. त्या मातीने बुजल्या आहेत. तसेच अनेक ठिकाणी कालवा तुटला असून त्यात झुडपे वाढली आहेत. ज्या ठिकाणी कालव्याची दैनावस्था झाली आहे तेथे पाणी साचत असल्याने शेतजमीनीला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मौजा वडगाव शिवारातील सुधाकर विठ्ठल बालपांडे यांच्या साडेचार एकरातील कपाशीचे पीक कालव्याच्या दैनावस्थेमुळे पिवळे पडले आहे. त्यांच्या शेताला तळ्याचे स्वरूप आले आहे. पाहिजे त्या पेक्षा जास्त पाणी शेतात साचल्यामुळे कपाशीला बोंडे आली नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहे. उत्तम पाटील यांचे शेत सुद्धा पडीक झाले आहे. लिकेजचा फटका नुकतीच लागवड केलेल्या गहु व चना पिकाला बसल्याचे शेतकरी सांगतात. तक्रार करूनही संबंधीत अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.(वार्ताहर)
नुकसान भरपाईची मागणी
कालव्याच्या लिकेजमुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेताला तलावाचे स्वरूप आले आहे. या भागातील अनेक शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच गहू आणि चना पिकाची लागवड केली. काही शेतातील पिके अंकुरली असतानाच कालव्याच्या पाण्यामुळे शेतात पाणी साचले आहे. परिणामी, अंकुरलेले पीक करपत असल्याचे दिसून येत आहे. अनेकांच्या शेतातील चना व गहू पिकाचे बियाणे पाण्यामुळे जमिनीतच सडल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. कालव्याच्या लिकेजमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने भरपाई देण्यात यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.