लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घाडगे) : सध्या खरीप हंगाम जोरात आला असून शेतकरी, शेतमजूर दिवसभर शेतामध्ये राबतात. त्यामुळे शेतशिवार हिरवागार झाल्याने वर्दळही वाढली आहे. परंतु राहाटी, काजळी, नागाझरी, धोतीवाडा, बांगडापूर, जोगा, नांदुरा, चिखली, खैरी व बोरगाव शिवारात भरदिवसा वाघाचे दर्शन होत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या वाघाला तातडीने जेरबंद करा, अन्यथा तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा प्रहारचे रोशन वरठी यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.
तालुक्यातील हा परिसर जंगलव्याप्त भागाला लागून असल्याने अनेकांची शेती या भागात आहे. सध्या सोयाबीन, तूर, कपाशी व संत्रा बांगामध्ये हिरवळ पसरली आहे. यामध्ये कधी वाघोबा लपून बसल्याचे दिसून येत आहे. बरेचदा शेतकरी व शेतमजुरांना या शिवारात वाघोबाचे दर्शन झाल्याने तो कधीही हल्ला करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागात शेती कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
जीव मुठीत घेऊन शेती व शेतीकामे करावी लागत असल्याने वनविभागाने तातडीने या वाघोबाचा बंदोबस्त करावा किंवा त्याला मारण्याची परवानगी द्यावी. अन्यथा वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावागावांमध्ये कर्मचाऱ्यांद्वारे दिवसरात्र गस्त घालावी. याकडे दुर्लक्ष झाल्यास दहशतीत असलेल्या शेतकऱ्यांची वाघामुळे शेती पडीक राहण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही निवेदनात म्हटले आहे.