सनातन संस्थेवर तत्काळ बंदी आणा
By Admin | Updated: October 6, 2015 02:55 IST2015-10-06T02:55:00+5:302015-10-06T02:55:00+5:30
धर्मजागृतीच्या नावावर देशात विद्वेष निर्माण करणाऱ्या आणि आतंकवाद स्थापित करू पाहणाऱ्या संस्थेवर सरकारने

सनातन संस्थेवर तत्काळ बंदी आणा
वर्धा : धर्मजागृतीच्या नावावर देशात विद्वेष निर्माण करणाऱ्या आणि आतंकवाद स्थापित करू पाहणाऱ्या संस्थेवर सरकारने तात्काळ बंदी आणावी, अशी मागणी जिल्ह्यातील सामाजिक, परिवर्तनवादी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत एका निवेदनाद्वारे राज्य शासनाकडे केली आहे.
देशातील विवेकवादी विचारांची आणि विचारवंतांची हत्या इथल्या सनातनी विचारांनीच केली आहे. धर्मांधतेचा कट्टर पुरस्कर्ता असणाऱ्या आणि साधकांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देणाऱ्या सनातन संस्थेच्या एका साधकाला गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे, असा आरोप निवेदनातून केला आहे. या प्रकरणाला कलाटणी देण्यासाठी आणि समाजाची दिशाभूल करण्यासाठी सनातन संस्थेच्या प्रवक्त्यांनी मुंबई येथे आयोजित पत्रपरिषदेत डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या प्रा. श्याम मानव यांनी केली अशी वल्गना करीत नवा वादंग निर्माण केला आहे, असा आरोप करीत सनातनच्या या वक्तव्यांचा जाहीर निषेधही निवेदनाद्वारे सर्व परिवर्तनवादी सामाजिक संघटनांच्यावतीने यावेळी करण्यात आला. सामाजिक संघटनांच्या संयुक्त मागणीचे सदर निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय अधीक्षक मडावी यांनी स्वीकारले. संघटनांद्वारे प्राप्त निवेदन शासनाकडे पाठविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी यावेळी सांगितले. शिष्टमंडळात अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सल्लागार संजय इंगळे तिगावकर, सत्यशोधक महिला प्रबोधिनीच्या नुतन माळवी, किसान अधिकार अभियानचे प्रेरक अविनाश काकडे, शेतकरी एकता मंचचे बाबाराव किटे, अ.भा. अंनिसचे जिल्हाध्यक्ष हरीश इथापे, प्रा. किशोर वानखडे, सुरेश राहाटे, पंकज वंजारे, प्रा. एकनाथ मुरकुटे, गुणवंत डकरे, सुधीर पांगुळ, राजा वानखेडे, सुधीर गिऱ्हे, राजू थूल, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस गजेंद्र सुरकार, डॉ. चंदू पोपटकर, प्रा. अरुण हर्षबोधी, किशोर ढाले, प्रशांत रोकडे, अल्का वानखेडे, रोहिणी देशकरी, संजय भगत, शारदा झामरे, राजा खडसे, प्रल्हाद इंगळे, दिवाकर इंगळे, रमेश चौधरी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)
वक्तव्याचा निषेध
४नरेंद्र दाभोळकर, गोवोंद पानसरे, कलबुर्गी या परिवर्तनवादी ज्येष्ठ विचारवंतांची या दोन वर्षात हत्या झाली आहे. दाभोळकरांच्या हत्येचा अद्यापही सुगावा लागलेला नाही. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातनच्या एका साधकाला अटक केली. परंतु समाजाची दिशाभूल करण्यासाठी सनातनने श्याम मानव यांच्यावर आरोप केल्याने सनातनच्या वक्तव्याचा निषेधही करण्यात आला.