लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सध्यास्थितीत धरणांच्या पाण्याची पातळी लक्षात घेता वर्धा व लगतच्या गावांत भविष्यात पाण्याचे भीषण संकट उद्भवण्याची शक्यता आहे. या दुष्काळ सदृष्य परिस्थितीवर मात करण्याकरिता योग्य उपाययोजना करण्यात यावी,अशी मागणी ना. सदाशिव खोत यांना सादर केलेल्या निवेदनातून युवा सोशल फोरम व राष्ट्रसेवा दलाच्यावतीने करण्यात आली आहे.गत ५० वर्षांत दरडोई पाण्याची उपलब्धता एक तृतीयांशाने कमी होत आहे. पावसाच्या प्रमाणात वर्षागणिक होत चाललेल्या घट यामुळे दरवर्षी वर्धा जिल्ह्यातील अनेक गावे दुष्काळाच्या छायेत असतात. वर्धा शहराला बोर प्रकल्प व धाम प्रकल्प महाकाळी येथून पाणी पुरवठा केल्या होतो. जानेवारी महिन्यातच बोर प्रकल्पात ४४.५७ टक्के व धाम प्रकल्प महाकाळी येथे ६१.६२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्याचप्रमाणे पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात घट होत आहे. भविष्यात जल संकटाची तीव्रता किती भीषण असेल याची कल्पना न केलेली बरी. भविष्यातील या जलसंकटाचा फटका नागरिकांना सहन करावा लागणार आहे. भविष्यातील परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध पाण्याचे कालबद्ध नियोजन करणे व त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. त्याबाबत आतापासूनच योग्य पावले उचलण्याची गरज आहे. नागरिकांना मुबलग पाणी मिळावे यासाठी नियोजन करून त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना युवा सोशल फोरमचे अध्यक्ष सुधीर पांगुळ, राष्ट्रसेवा दलाचे जिल्हा संगठक अविनाश सोमनाथे, नितेश पाटील, सचिन कोटंबकार, प्रकाश गायकवाड, एकनाथ डहाके, गोलू पाखडे, विवेक तळवेकर, मिलिंद मोहोड यांच्यासह युवा सोशल फोरम तसेच राष्ट्रसेवा दलचे कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्ह्यातील पाणीटंचाईवर तत्काळ उपाययोजना करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 23:44 IST
सध्यास्थितीत धरणांच्या पाण्याची पातळी लक्षात घेता वर्धा व लगतच्या गावांत भविष्यात पाण्याचे भीषण संकट उद्भवण्याची शक्यता आहे. या दुष्काळ सदृष्य परिस्थितीवर मात करण्याकरिता योग्य उपाययोजना करण्यात यावी,
जिल्ह्यातील पाणीटंचाईवर तत्काळ उपाययोजना करा
ठळक मुद्दे युवा सोशल फोरमची मागणी : सदाशिव खोत यांना निवेदनातून साकडे