अवैध प्रवासी वाहतूक जोरात
By Admin | Updated: September 18, 2014 00:02 IST2014-09-18T00:02:16+5:302014-09-18T00:02:16+5:30
शहरातील नागरिक अनेक दिवसांपासून अवैध प्रवासी वाहतुकीने त्रस्त झाले आहे. पोलीस प्रशासनाचा यावर वचक नसल्यामुळे पोलिस स्टेशन समोरुनच ही अवैध प्रवासी वाहतूक होत असते.

अवैध प्रवासी वाहतूक जोरात
पुलगाव : शहरातील नागरिक अनेक दिवसांपासून अवैध प्रवासी वाहतुकीने त्रस्त झाले आहे. पोलीस प्रशासनाचा यावर वचक नसल्यामुळे पोलिस स्टेशन समोरुनच ही अवैध प्रवासी वाहतूक होत असते. शिवाय मुख्य मार्गाच्या बाजूला उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे या मार्गावर वाहतुकीची कोंडी होत असते.
शहरातून हैद्राबाद-भोपाल व नागपूर-मुंबई हे महामार्ग जात असून या दोन्ही मार्गावर जड वाहनांची वर्दळ वाढली आहे. तसेच अहेरी-परतवाडा या मार्गावरही वाहनांची वर्दळ वाढली आहे. या मार्गांवर मुख्य बाजारपेठ व शाळा, महाविद्यालये असून विद्यार्थ्यांची वर्दळ असते. याच मार्गावरील रेल्वे स्टेशन ते बालाजी मंदिर व कॉटन मील ते नगरपरिषद हायस्कूलपर्यंत रस्त्याच्या बाजूला वाहनांची रांग लागली असते. तासनतास जडवाहन उभी असतात. त्यामुळे या मार्गावरील जोड रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांना समोरून येणारी वाहने दिसत नसल्यामुळे येथे लहान मोठे अपघात घडत असतात. स्टेशन चौकात वाहतुक नियंत्रक शिपायांची नेमणूक असते, परंतु हे शिपाई महामार्ग किंवा गल्लीबोळातून जाणाऱ्या आॅटो चालकाची गळाला लागण्याची वाट पहात फिरत असल्याचे चित्र आहे. यामुळे या वाहतुकीकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ नसल्याची स्थिती आहे. इतकेच नव्हे तर अवैध प्रवासी वाहने गांधी चौक सारख्या वर्दळीच्या ठिकाणी सुध्दा भरधाव नेतांना दिसतात. त्यामुळे नागरिकांना रस्ता ओलांडताना भीती वाटते. मात्र पोलिस प्रशासन या सर्व गोष्टीकडे डोळे मिटून पहात असल्याचा शहरवासीयांचा आरोप आहे. पोलिस प्रशासनाने याची त्वरीत दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे.
शहराची वाहतूक या जड वाहनांमुळे प्रभावित होते. बरेचदा रस्त्याच्या कडेला वाहन उभे राहत असल्याने समोरुन येत असलेल्या वाहन चालकांना याचा अंदाज येत नाही. म्हणून येथे अपघात घडतात. याकरिता रस्त्याच्या कडेला उभ्या वाहनांवर कारवाई केल्यास याला पायबंद बसेल. या मागणीकडे लक्ष देत तातडीने कारवाई करणे गरजेचे झाले आहे.(तालुका प्रतिनिधी)