लिलाव न घेता बेकायदेशीर मुदतवाढ
By Admin | Updated: November 18, 2015 02:14 IST2015-11-18T02:14:36+5:302015-11-18T02:14:36+5:30
देवळी तालुक्यातील नाचणगाव येथील देव तलाव व शिंगाडे तलावाचा जाहीर लिलाव न करता ठेकेदाराला परस्पर मुदतवाढ देण्यात आली आहे.

लिलाव न घेता बेकायदेशीर मुदतवाढ
वर्धा : देवळी तालुक्यातील नाचणगाव येथील देव तलाव व शिंगाडे तलावाचा जाहीर लिलाव न करता ठेकेदाराला परस्पर मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ही बेकायदेशीर मुदतवाढ रद्द करून दोन्ही तलावांचा नव्याने जाहीर लिलाव करावा अशी मागणी गणेश पंजाब रावेकर यांनी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली.
निवेदनानुसार गणेश रावेकर हे मत्स्यपालन व मत्स्यविक्री करून परिवाराचे पालनपोषण करतात. तीन वर्षांपूर्वी ७ सप्टेंबर २०१२ रोजी नाचणगाव येथील देव तलाव आणि शिंगाडे तलावाचा जाहीर लिलाव ग्रामपंचायत प्रशासनाद्वारे करण्यात आला होता. लिलावांतर्गत गणेश रावेकर यांच्यासह आणखी तिघांना तीन वर्षांसाठी दोन्ही तलाव देण्यात आले होते. या लिलावाची मुदत ७ सप्टेंबर २०१५ रोजी संपली. त्यानंतर या तलावाचा नव्याने लिलाव करणे गरजेचे असतानाही ग्रामपंचायत प्रशासनाद्वारे लिलावासंदर्भात कोणतीही सूचना किंवा गावात दवंडी न देता त्याच ठेकेदाराला तलावाची मुदतवाढ दिली असा आरोप रावेकर यांनी निवेदनात केला आहे.
यासंदर्भात सरपंच व सचिवांना रावेकर यांनी विचारणा केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याचेही निवेदनात नमूद आहे. यावर कारवाई करण्यासाठी रावेकर यांनी ग्रामपंचायतच्या १० सदस्यांच्या सहीनिशी एक निवेदन ग्रामपंचायत कार्यालयाला सादर केले. परंतु अद्यापही त्यावर कुठलाही विचार झालेला नाही. त्यामुळे नव्याने लिलाव न करता जुन्याच ठेकेदाराला परस्पर दिलेली मुदतवाढ रद्द करून ग्रामपंचायतने नव्याने जाहीर लिलाव करावा अशी मागणी गणेश रावेकर यांनी जि. परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे. तसेच निवेदनाच्या प्रति देवळीचे गटविकास अधिकारी, आमदार रणजीत कांबळे यांनी देऊन न्यायाची मागणी केली आहे.(शहर प्रतिनिधी)