वनक्षेत्रात अवैध उत्खनन
By Admin | Updated: April 25, 2016 01:55 IST2016-04-25T01:55:58+5:302016-04-25T01:55:58+5:30
ग्रामीण भागात गौण खनिजमाफिया सक्रिय झाले आहे. झडशी वनपरिक्षेत्र परिसरात मुरूम, रेती व मातीची बेसुमार लूट केली जात आहे.

वनक्षेत्रात अवैध उत्खनन
टेकड्या होताहेत उद्ध्वस्त : मुरूम, रेती व मातीची बेसुमार लूट
आकोली : ग्रामीण भागात गौण खनिजमाफिया सक्रिय झाले आहे. झडशी वनपरिक्षेत्र परिसरात मुरूम, रेती व मातीची बेसुमार लूट केली जात आहे. असे असतानाही वन व महसूल प्रशासन काहीही घडत नसल्यासारखे शांत बसून आहे. त्यामुळे अवैध उत्खननाला मूक संमती तर नाही ना असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
जंगलातील टेकड्या उद्ध्वस्त केल्या जात आहे. मुरूम काढण्याकरिता पोकलँडचा वापर होत आहे. जंगलातील झाडे उत्खननामुळे कोलमडून पडत असताना अधिकारी वर्ग रात्री कशी कारवाई करणार असे सांगत आहे. त्यामुळे गौण खनिज माफीयांसाठी रान मोकळे करून दिल्याचे चित्र दिसत आहे.
टिप्पर व ट्रॅक्टरद्वारे रविवारी दिवसा तर अन्य दिवशी रात्रभर ही अवैध गौण खनिज वाहतूक सुरू असल्याचे ग्रामस्थ सांगतात. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे.(वार्ताहर)
मातीची सर्रास चोरटी वाहतूक सुरू
जंगलाशेजारी नापिक जमीन मालकाला थोडीशी रक्कम देऊन कायदा पायदळी तुडवत मातीची सर्रास चोरटी वाहतूक होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे काही वीटभट्टी मालकांनी मातीची रॉयल्टी काढली नसताना लाखो विटा विकल्या आहेत. तसेच निर्मिती प्रक्रियाही सुरूच आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे मातीची रॉयल्टी नसताना वीटभट्टी चालकांना माती मिळते कुठून हा प्रश्नच आहे. अधिकारी, कर्मचारी त्यांना काहीही विचारत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
जंगलक्षेत्रात भटकंती करीत असताना अनेक ठिकाणी खड्डे आढळून येतात.
जामणी नजीकच्या पुलावजळ रोडच्या अगदी बाजूला दोन टेकडे आहे. अत्यंत वर्दळीचा रस्ता असतानाही येथे भर दिवसा मजूर ट्रॅक्टरमध्ये माती भरून नेत असताना पाहावयास मिळते.