गिरोलीच्या खदाणीतून अवैध उत्खनन
By Admin | Updated: May 15, 2015 02:00 IST2015-05-15T02:00:55+5:302015-05-15T02:00:55+5:30
नजीकच्या गिरोली (ढगे) येथील गिट्टीखदाण काही वर्षांकरिता लिजवर घेतली आहे़ या खदाणीतून अवैध उत्खनन करण्यात येत आहे़ ..

गिरोलीच्या खदाणीतून अवैध उत्खनन
झडशी : नजीकच्या गिरोली (ढगे) येथील गिट्टीखदाण काही वर्षांकरिता लिजवर घेतली आहे़ या खदाणीतून अवैध उत्खनन करण्यात येत आहे़ शिवाय नियमांना डावलून खोलवर ब्लास्टींग केले जात असल्याने नागरिकांच्या घरांना हादरे बसतात़ महसूल तसेच खनिकर्म विभागाने याकडे लक्ष देत सदर खदाण रद्द करावी, अशी मागणी गिरोली येथील नागरिकांनी केली आहे़
खदाणीमध्ये नियमानुसार एक-दीड फुट खोलीवर ब्लास्टींग करणे गरजेचे आहे; पण खदाणधारक तसे न करता पाच-सहा फुट खोलीवर ब्लास्टींग करीत आहे़ यामुळे गावातील घरांना हादरे बसतात़ याबाबत नागरिकांनी हटकले असता अरेरावी केली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे़ गिट्टी विकायची असली तर संबंधित ग्राहकांकडून रॉयल्टीचे पैसे घेतले जातात; पण शासनाच्या तिजोरीत रॉयल्टी न भरता परस्पर गिट्टीची विक्री केली जाते. इतकेच नव्हे तर खाणधारकांनी सभोवतालच्या टेकड्यांवरील मुरूम विना रॉयल्टी विकणे सुरू केले आहे़ प्रशासनाची कारवाई टाळण्याकरिता शनिवारी दुपारपासून तर रविवारी सायंकाळपर्यंत गौण खनिजाची अवैधरित्या वाहतूक केली जाते़ या सर्व प्रकारामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे; पण महसूल विभागातील अधिकारी कुठलीही कारवाई करताना दिसत नाही़
गिट्टी, मुरूम आदी गौण खनिजाची वाहतूक करताना वाहन क्षमतेच्या मापदंडाच्या अधिन राहून वाहतूक करणे गरजेचे असते; पण या गिट्टीखदाणवरून ट्रक ओव्हरलोड वाहतूक केली जाते. यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे़ यास जबाबदार कोण, असा प्रश्नही ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत़ वाहतूक नियंत्रण अधिकारीही ओव्हरलोड वाहतुकीकडे दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़ यापूर्वी गिरोली ग्रा़पं़ ने सदर गिट्टी खदाणीला ना-हरकत प्रमाणपत्र देऊ नये, असा ठराव घेतला होता़ यानंतर पुन्हा ना-हरकतीसाठी सभा घेण्यात आली़ शिवाय ग्रामस्थांतही दोन गट असल्याने खाण धारकाचे फावत आहे़ महसूल व खनिकर्म विभागाने यात हस्तक्षेप करून सदर खदाणीची संपूर्ण चौकशी करावी व ग्रामस्थांच्या समस्या सोडवाव्या, अशी मागणी होत आहे़(वार्ताहर)