पोलिसांच्या दुर्लक्षामुळे अवैध व्यवसाय तेजीत

By Admin | Updated: November 15, 2015 01:32 IST2015-11-15T01:32:00+5:302015-11-15T01:32:00+5:30

अल्लीपूर पोलीस ठाण्यांतर्गत येणारे धोत्रा (कासार) हे गाव वर्धा-हिंगणघाट-चंद्रपूर मार्गावर मोठे गाव आहे.

Illegal business escalated due to police recruitment | पोलिसांच्या दुर्लक्षामुळे अवैध व्यवसाय तेजीत

पोलिसांच्या दुर्लक्षामुळे अवैध व्यवसाय तेजीत

राजरोसपणे होतेय दारूविक्री : विद्यार्थ्यांना ये-जा करताना त्रास, अल्पवयीन मुलेही आहारी
वर्धा : अल्लीपूर पोलीस ठाण्यांतर्गत येणारे धोत्रा (कासार) हे गाव वर्धा-हिंगणघाट-चंद्रपूर मार्गावर मोठे गाव आहे. या गावात सध्या पोलिसांच्या दुर्लक्षामुळे अवैध व्यवसाय तेजीत असल्याचे चित्र आहे. अवैध दारूविक्री सट्टा, जुगार आदी फोफावल्याने सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी सामान्यांतून होत आहे.
महामार्गावरील या गावात विविध लहान-मोठे व्यवसाय आहेत. बाहेर गावांतून येणाऱ्या नागरिकांची येथे नेहमीच रेलचेल असते. गावाला तीन वर्षांपूर्वी तंटामुक्त गाव पुरस्कार मिळाला; पण त्या पुरस्काराच्या प्रकाशात दडलेल्या गावात अल्लीपूर पोलिसांच्या दुर्लक्षामुळे अवैध व्यावसायिकांनी धुमाकूळ घातला आहे. अवैध दारूविक्री, मटका, जुगार असे अनेक अवैध व्यवसाय पोलिसांनी चिरीमिरी घेऊन सुरू ठेवल्याचे दिसते. गावातील चौकांत दारूचे पाट वाहताना दिसतात. यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या महिला, विद्यार्थिनी तसेच विद्यार्थ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. यावर नियंत्रण ठेवण्यात अल्लीपूर पोलीस ठाणे अपयशी ठरले आहे.
मागील वर्षी दारूबंदी मंडळाच्या महिला व तंटामुक्त ग्राम समितीने दारूवर आळा घालण्यात यश मिळविले होते; पण पोलिसांच्या असहकार्यामुळे व आवक बंद झाल्याने गावात पुन्हा दारूने डोके वर काढले आहे. काहीच दिवस दारूबंदी टिकलेल्या धोत्रा येथे कायम दारूबंदी करण्याची मागणी महिलांतून होत आहे. गावातील विद्यार्थी, विद्यार्थिनी शिक्षणासाठी वर्धा, वायगाव येथे जातात. विद्यार्थ्यांवर रात्री परत येण्याची वेळ बरेचदा येते. या विद्यार्थ्यांना धोत्रा गावात जाताना तळीरामांच्या धुमाकूळाला सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत. चिडीमारीच्या प्रकारामुळे शिक्षण घेण्यास जाणेही कठणी झाले आहे. याबाबत बीट जमादारांना माहिती असताना त्याकडे लक्ष दिले जात नसल्याची ओरड ग्रामस्थांतून होत आहे.
अल्लीपूर पोलिसांनी दारूला सुट तर दिली नाही ना, अशीच शंका उपस्थित होत आहे. पोलिसांना हप्ता ठरवून दिलेला आहे, हप्ता न दिल्यास सतत धाडसत्र सुरू असते, अशी माहिती एका दारूविक्रेत्यानेच नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. खुलेआम चालणाऱ्या दारूविक्री व अवैध व्यवसायांमुळे गावातील वातावरण खराब होत आहे. भांडणांचे प्रमाण वाढले असून सलोखा राहिला नाही. ही बाब लक्षात घेत पोलीस अधीक्षकांनी कारवाईचे आदेश द्यावेत, अशी मागणी होत आहे.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Illegal business escalated due to police recruitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.