लॉकडाऊनमधील अवैध उपक्रम बसला मानगुटीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 05:00 IST2020-06-13T05:00:00+5:302020-06-13T05:00:32+5:30
बिबट्याच्या शिकारप्रकरणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर आढळलेल्या पुराव्यावरून सुरुवातीला तिघांना ताब्यात घेत विचारपूस केली. याच विचारपूसदरम्यान ठोस माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या हाती लागल्यानंतर आकोली (हेटी) येथील रहिवासी असलेल्या धनराज सांडे, संजय सोळंकी व अजित राठोड याला ताब्यात घेत विचारपूस करण्यात आली.

लॉकडाऊनमधील अवैध उपक्रम बसला मानगुटीवर
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : खरांगणा वनपरिक्षेत्रात येणाऱ्या सुकळी उबार शिवारात रानडुक्कर पकडण्याच्या जाळ्याने बिबट्याची शिकार करण्यात आली. या प्रकरणातील तीन आरोपींना वनविभागाने जेरबंद केले असून भटक्या जमातीतील या तिन्ही आरोपींनी कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात शिकारीचा अवैध गोरखधंदा सुरू केला होता, असे वनविभागाच्या आतापर्यंतच्या चौकशीत पुढे आले आहे.
बिबट्याच्या शिकारप्रकरणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर आढळलेल्या पुराव्यावरून सुरुवातीला तिघांना ताब्यात घेत विचारपूस केली. याच विचारपूसदरम्यान ठोस माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या हाती लागल्यानंतर आकोली (हेटी) येथील रहिवासी असलेल्या धनराज सांडे, संजय सोळंकी व अजित राठोड याला ताब्यात घेत विचारपूस करण्यात आली. सुरूवातीला उडवाउडवीची उत्तरे देणारे हे तिन्ही संशयित बोलके होत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर या तिन्ही आरोपींना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयात हजर करून त्यांची १५ जूनपर्यंत वनकोठडी मिळविली आहे. आतापर्यंतच्या तपासात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या आरोपींपासून घटनास्थळावर सापडलेल्या जाळ्याव्यतिरिक्त उर्वरित जाळे जप्त केले आहे. यापूर्वी एक भाला आणि घटनास्थळावरून जाळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले आहे. हे प्रकरण पुढे कुठले नवीन वळण घेते, याकडे लक्ष लागले आहे.
आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता
बिबट्याची शिकार प्रकरणात सध्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तिघांना जेरबंद करून त्यांची वनकोठडी मिळविली असली तरी या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून वर्तविली जात आहे. आतापर्यंत काही व्यक्तींचे बयानही नोंदविण्यात आले आहे.