पाणी पुरवठा योजनेतील दोष दुरूस्तीकडे दुर्लक्ष
By Admin | Updated: October 28, 2016 01:41 IST2016-10-28T01:41:55+5:302016-10-28T01:41:55+5:30
नळांना आठ-आठ दिवस पाणी न येणे, आले तरी अपुरे पाणी येणे यासोबतच एखाद्याच्या घरी असलेल्या वैयक्तिक नळाच्या पाईप-लाईनमध्ये

पाणी पुरवठा योजनेतील दोष दुरूस्तीकडे दुर्लक्ष
आठ दिवस नसते पाणी : ग्रामस्थांत असंतोष
रोहणा : नळांना आठ-आठ दिवस पाणी न येणे, आले तरी अपुरे पाणी येणे यासोबतच एखाद्याच्या घरी असलेल्या वैयक्तिक नळाच्या पाईप-लाईनमध्ये कचरा वा माती अडकून निर्माण होणारा दोष दुरूस्त करण्याबाबत ग्रा.पं. प्रशासन अत्यंत उदासीन आहे. यामुळे नळधारकांना महिना-महिना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
येथील पाणी पुरवठा योजना अत्यंत जीर्ण झाली असून अनेक दोष निर्माण झाले आहेत. यामुळे गावातील पाणी पुरवठा प्रभावित होत आहे. पावसाळ्यातही सदर योजनेद्वारे ग्रामस्थांना दररोज पाणी मिळू शकत नाही. यातच पाईपलाईनमधून पाणी येताना कचरा वा माती येण्याचे कुठलेच कारण नाही. असे असताना गावातील अनेकांचे वैयक्तिक नळ बुजतात. परिणामी, त्यातून पाणी येत नाही. हे दोष दुरूस्ती करण्याची जबाबदारी ग्रा.पं. प्रशासनावर असते; पण अलीकडे दोष दुरूस्तीबाबत ग्रा.पं. दुर्लक्ष करीत असल्याने नळधारकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे.
पाणी पुरवठा योजनेतील दोष दूर करण्यासाठी महिन्याभराचा कालावधी लावला जातो. कर्मचारी, पदाधिकारी यांना माहिती देऊनही फारशी दखल घेतली जात नाही. एका नळधारकाच्या नळात दोन महिन्यांपूर्वी दोष निर्माण झाला होता. तो दोष दुरूस्त करून एक महिना होत नाही तर पुन्हा दोष निर्माण होऊन पाणी येणे बंद झाले. सदर दोषाबाबत ग्रा.पं. माहिती देऊन एक महिन्याचा काळ लोटत असताना दुरूस्ती झाली नाही. दिवाळीचा सण असताना नळ दुरूस्ती न केल्याने असंतोष पसरला आहे. ग्रा.पं. प्रशासनाने याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे आहे.(वार्ताहर)