विद्यार्थी मोडला तर आयुष्यात दुरुस्त होणार नाही
By Admin | Updated: October 5, 2016 01:52 IST2016-10-05T01:52:05+5:302016-10-05T01:52:05+5:30
इमारत मोडली तर पुन्हा बांधता येईल, स्वच्छतागृह मोडले तर पुन्हा बांधता येईल; पण विद्यार्थी मोडला तर पुन्हा आयुष्यात कधीही बांधता येणार नाही.

विद्यार्थी मोडला तर आयुष्यात दुरुस्त होणार नाही
शैलेश नवाल : तळेगाव (टा.) जि.प. प्राथमिक शाळेची केली पाहणी, परिसरात वृक्षारोपण
तळेगाव (टा.) : इमारत मोडली तर पुन्हा बांधता येईल, स्वच्छतागृह मोडले तर पुन्हा बांधता येईल; पण विद्यार्थी मोडला तर पुन्हा आयुष्यात कधीही बांधता येणार नाही. यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांकडे लक्ष दिले पाहिजे, असे मत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी व्यक्त केले.
जि.प. प्राथमिक शाळा तळेगाव (टा.) येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जि.प. सदस्य मिलिंद भेंडे, पं.स. सदस्य विमल वरभे, सरपंच अतुल तिमांडे, केंद्र प्रमुख वसंत खोडे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी नवाल पूढे म्हणाले की, शिक्षकांची जेवढी जबाबदारी आहे, तेवढीच पालकांची आहे. शिक्षकांनी आपली जबाबदारी पार पाडावी. अभियंता चुकला तर एक पूल खचेल, डॉक्टर चुकला तर एक पेंशट मरेल; पण एक शिक्षक चुकला तर पूर्ण पिढी गारद होईल. यामुळे शिक्षकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. सोबतच विद्यार्थ्यांनी वैयक्तिक स्वच्छता पाळावी. गावात घरोघरी शौचालय बांधून त्याचा नियमित वापर करावा, असेही जिल्हाधिकारी नवाल यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेच्या वर्गांची पाहणी करीत मुलांशी संवाद साधला. ज्ञानरचनावादावरील साहित्याचा विद्यार्थी कसा उपयोग करून घेतात, याबाबत जाणून घेतले. हसत-खेळत विद्यार्थ्यांशी हितगुज केले. विद्यार्थ्यांनीही उत्तरे दिली. खोडे यांनी शाळेच्या प्रगतिबाबत माहिती दिली. यानंतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
भेंडे यांनी प्रास्ताविकातून शाळेचे उपक्रम, पालकांचा सहभाग याबाबत माहिती दिली. संचालन करीत आभार खोडे यांनी मानले. कार्यक्रमाला शाळा व्य.स.चे सदस्य सुधीर कोल्हे, मनोहर राऊत, विनोद गोडे, अनिल शंभरकर, सुरज गणवीर, प्रफुल्ल गर्गे, सुधीर सगणे, मनोज मस्के, विजय झाडे, सुनील कोल्हे, योगिराज पाटील, राजेंद्र भोयर, चंद्रशेखर वैद्य, भगत आदींनी सहकार्य केले.(कार्यालय प्रतिनिधी)