विदर्भ प्रदेशाकरिता सदस्यांचे वर्धेत विचारमंथन
By Admin | Updated: February 28, 2016 02:11 IST2016-02-28T02:11:18+5:302016-02-28T02:11:18+5:30
वेगळ्या विदर्भाची मागणी गत अनेक दिवसांपासून शासन दरबारी रेटण्यात आली आहे. शांततेने सुरू असलेल्या या मागणीकडे शासनाच्यावतीने अद्याप लक्ष पुरविण्यात आले नाही.

विदर्भ प्रदेशाकरिता सदस्यांचे वर्धेत विचारमंथन
पत्रपरिषद : दीड हजार सदस्यांची उपस्थिती
वर्धा : वेगळ्या विदर्भाची मागणी गत अनेक दिवसांपासून शासन दरबारी रेटण्यात आली आहे. शांततेने सुरू असलेल्या या मागणीकडे शासनाच्यावतीने अद्याप लक्ष पुरविण्यात आले नाही. या आंदोलनाची दिशा ठरविण्याकरिता व विदर्भाच्या मागणीवर विचारमंथन करण्याकरिता रविवारी विदर्भ प्रदेश विकास परिषदेचा मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विलास कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या मेळाव्यात खासदार रामदास तडस, माजी खासदार दत्ता मेघे, आ. डॉ पंकज भोयर, आ. समीर कुणावार, माजी खासदार सुरेश वाघमारे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
वेगळ्या विदर्भाची मागणी शासनदरबारी अनेक दिवसांपासून धुळखात आहे. मात्र शासनाकडून त्याला मान्यता मिळाली नाही. विदर्भ प्रदेश विकास परिषदेच्यावतीने माजी खासदार दत्ता मेघे यांनी याच विषयावर चर्चा करण्याकरिता सावंगी (मेघे) येथील सभागृहात सदस्यांशी चर्चा करण्याकरिता मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याला विदर्भातून सुमारे दीड हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती विलास कांबळे यांनी यावेळी दिली.
शिवाय जिल्हा परिषदेत येत्या सर्वसाधारण सभेत ठराव घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सोबतच विदर्भाकरिता राबविण्यात येणार असलेल्या दहा कलमी कार्यक्रमाची माहितीही दिली. यावेळी दिलीप अग्रवाल उपस्थित होते.(प्रतिनिधी)