‘त्या’ मृतदेहाची ओळख पटली
By Admin | Updated: June 15, 2014 23:43 IST2014-06-15T23:43:06+5:302014-06-15T23:43:06+5:30
कोरा मार्गावर असलेल्या नालीत शनिवारी सायंकाळी एका इसमाचा मृतदेह आढळून आला होता. त्याच्या शरीरावर असलेल्या जखमांवरून वेगवेगळे कयास लावले जात होते. त्या मृतदेहाची ओळख पटली असून

‘त्या’ मृतदेहाची ओळख पटली
मृत नागपुुरातील : शवविच्छेदन अहवालावर भिस्त
गिरड : कोरा मार्गावर असलेल्या नालीत शनिवारी सायंकाळी एका इसमाचा मृतदेह आढळून आला होता. त्याच्या शरीरावर असलेल्या जखमांवरून वेगवेगळे कयास लावले जात होते. त्या मृतदेहाची ओळख पटली असून त्याचे नाव महानंद नारायण भगत (६२) रा. मटकाझरी, ता. उमरेड, जि. नागपूर असे असल्याचे पोलिसांनी सांगितले. हा इसम वेडसर असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ८ जून २०१४ रोजी गिरड टेकडीवर तो कुटुंबासहित नवस फेडण्यासाठी आला होता; परंतु स्वयंपाक सुरू असताना सर्वांची नजर चुकवून तो बेपत्ता झाला. शोधाशोध करूनही तो सापडला नाही. तो सापडत नसल्याने त्याच्या कुटुंबीयांनी बेपत्ता झाल्याची तक्रार गिरड पोलिसांमध्ये ९ जूनला नोंदविली होती. तसेच त्याच्या अंगावर निळ्या रंगाचा जयभिम लिहिलेला दुपट्टा असल्याची खुण सांगितली होती. शनिवारी रात्री तपास करताना ठाणेदार चिंचोळकर यांना मृताजवळ जयभिम लिहिलेला दुपट्टा आढळला.
यावरून गिरड पोलिसांनी भगत यांच्या कुटुंबीयांना सदर माहिती दिली. भगत कुटुुंबीयांनी गिरड पोलीस ठाणे गाठले. मृतदेह तपासणीअंती तो महानंद भगत याचाच असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर हिंगणघाट येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह गिरड येथील स्मशानभूमीत दफन करण्यात आला.
महानंद हा वेडसर असल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले. तसेच बेपत्ता झाल्यानंतर तो अनेकांना गिरड कोरा रस्त्यावर फिरतांना दिसला होता; परंतु त्याच्या मृत्यूचे ठोस कारण अद्याप कळू शकले नाही. त्याचा मृत्यू उष्माघाताने झाला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल असे सांगितले. घटनेचा तपास ठाणेदार ओमकांत चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार शंकर भलावी, वामन घोडे, संजय चाटे, नागोसे, भांडारकर करीत आहेत.(वार्ताहर)