आदर्श ग्राम विकासाचे ‘मॉडेल’ ठरतेय तरोडा

By Admin | Updated: January 17, 2015 02:18 IST2015-01-17T02:18:22+5:302015-01-17T02:18:22+5:30

सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत तरोडा या गावांची निवड करण्यात आली होती़ यामुळे केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध विकास योजनांच्या अंमलबजावणीमध्ये असलेले आदर्श गाव...

Ideal village development model 'Taroda' | आदर्श ग्राम विकासाचे ‘मॉडेल’ ठरतेय तरोडा

आदर्श ग्राम विकासाचे ‘मॉडेल’ ठरतेय तरोडा

वर्धा : सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत तरोडा या गावांची निवड करण्यात आली होती़ यामुळे केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध विकास योजनांच्या अंमलबजावणीमध्ये असलेले आदर्श गाव म्हणून तरोड्याचा विकास करण्यात येत आहे. तरोडा हे गाव जिल्ह्यातील विकासाचे ‘मॉडेल’ ठरत आहे. खासदार रामदास तडस यांनी सांसद आदर्श ग्राम योजनेत या गावाची निवड केली आहे.
सांसद आदर्श गाव म्हणून तरोड्याचा विकास करताना जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रभारी अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विविध विभागांच्या समन्वयासोबतच विभागांतर्फे राबविण्यात येणाऱ्या योजना तरोडा या गावात कशा राबविता येतील, या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत़ तेथील जनतेला या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठीही विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ अंमलबजावणी करून तरोडा हे गाव सांसद आदर्श गाव म्हणून विकसित करावयाच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्याकरिता जिल्हास्तरावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती राहणार आहे़ या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी राहणार आहेत़
सांसद आदर्श गाव म्हणून तरोड्याचा विकास करताना राज्यास्तरावरील हिवरे बाजार या गावाच्या विकासाच्या मॉडेलचा अभ्यास करण्यासाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी आदींचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. योजनांच्या अंमलबजावणीमध्ये येथील नागरिकांचाही सहभाग राहावा, यासाठी गाव सहभागीकरण प्रक्रिया येथे राबविण्यात येणार आहे.
आदर्श गावाची संकल्पना साकार करताना गावच्या स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आला आहे़ ग्रामस्थांच्या सहभागाने स्वच्छता फेरी काढण्यात आली होती. गावाचा हागणदारीमुक्त आराखडाही तयार करण्यात आला आहे. गावातील प्रत्येक कुटुंबांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी ‘बेसलाईन सर्व्हे’ करण्यात येत आहे़ यामध्ये कुटुंबपत्रक भरून घेण्यात येत आहे. महसूल विभागाच्यावतीने महसूल दिनाचे आयोजन करून नागरिकांना शासनातर्फे आवश्यक असलेले दाखले आणि प्रमाणपत्र देण्यात येत आहेत़ विविध शासकीय विभागांना सांसद आदर्श गाव राबविण्यासाठी आराखडा तयार करून देण्यात आला आहे़ त्यानुसार जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्यावतीने पशुवैद्यकीय शिबिर, आरोग्य विभागाच्यावतीने ग्रामस्थांकरिता आरोग्य शिबिर, पंचायत विभागाद्वारे कुटुंबनिहाय माहितीचे संकलन आदी कार्यक्रमही राबविण्यात येत आहेत.(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Ideal village development model 'Taroda'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.