राजकारणात यायचे असते तर कधीच आलो असतो

By Admin | Updated: October 25, 2015 02:05 IST2015-10-25T02:05:03+5:302015-10-25T02:05:03+5:30

शेतकरी आत्महत्या करताहेत, त्यांना मदत करायचे काम मी हाती घेतले आहे. यात शासन काय करतेय, याचा विचार मी करीत नाही.

I have never been in politics and I have never been there | राजकारणात यायचे असते तर कधीच आलो असतो

राजकारणात यायचे असते तर कधीच आलो असतो

नाना पाटेकर : शासनाला ‘सॉफ्ट कॉर्नर’ नाही
वर्धा : शेतकरी आत्महत्या करताहेत, त्यांना मदत करायचे काम मी हाती घेतले आहे. यात शासन काय करतेय, याचा विचार मी करीत नाही. शासनाकडे मागण्यापेक्षा आपल्याला जे करता येते ते करायचे, असे ठरविले आहे. यात शासनाला सॉफ्ट कॉर्नर देण्याचा प्रश्नच नाही. मला राजकारणात यायचे असते तर कधीच आलो असतो; पण ते करायचे नाही. माणूस म्हणून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचं दु:ख वाटून घेण्याचा प्रयत्न करीत असल्याची ग्वाही नाम फाऊंडेशनचे नाना पाटेकर यांनी दिली.
शेतकरी आत्महत्या या सदोष आर्थिक धोरणांचा परिपाक आहे. यात शेतकऱ्यांना मदत करून शासनाला सॉफ्ट कॉर्नर तर दिला जात नाही ना, या प्रश्नावर पत्रकार परिषदेत नाना उत्तर देत होते. अगदी मुद्यालाच हात घातल्याने थोडे वैतागून पाटेकर यांनी भूमिका स्पष्ट केली. मकरंद अनासपुरे यांनीही हे काम आताच करीत नाही तर यापूर्वीही शेतकरी कुटुंबांना मदत केल्याचे सांगितले. सरकार मोठं आहे. ते देतील तेव्हा मिळेल, आपल्याला काय करता येऊ शकते, याचा विचार नामच्या माध्यमातून केला जात असल्याचेही नानांनी सांगितले. सध्या नाम लहान आहे. तीनच महिन्यांपूर्वी या कामाला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांना हळूहळू हात घालणार आहे. हा किती लांब प्रवास आहे, हे माहिती नाही. यासाठी काही पुरस्कार नको की देवत्वही नको. माणूस म्हणून माणसांची मदत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याने नाना पाटेकर यांनी सांगितले.
नामने दोंदलगाव, गोगलगाव या गावांत जलसंधारणाची कामे सुरू केली असून ती ८० टक्के पूर्ण झालीत. वर्धा जिल्ह्यातील आमला येथेही पाण्याचा तुटवडा आहे. तेथे काम सुरू झाले आहे. गावात किती बदल करता येऊ शकतो, हे पाहणार आहे.
गावातील बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न केले जाणार आहे. गावातील विधवा, परित्यक्त्या यांच्यासाठी काही लघुउद्योगांची व्यवस्था होते काय, या दिशेनेही प्रयत्न होणार असल्याचे अनासपुरे म्हणाले. माणसांनी माणसांसाठी चालविलेला माणुसकीचा प्रयत्न म्हणजे नाम, अशी साधी, सरळ परिभाषा आमची आहे. लोकसहभागातून कामे केली जाणार आहेत. आम्ही शहरातून कामांसाठी माणसं आणणार नाही. श्रमदान करून आपले गाव आपल्यालाच बदलायचे आहे, असेही ते म्हणाले.(कार्यालय प्रतिनिधी)
उत्तम पीक असतानाही हमी नाही
शनिवारी आमला या गावातील शेती पाहिली. आठ एकरामध्ये बऱ्यापैकी कपाशीचे पीक दिसत होते. यातून सुमारे ७० क्विंटल कापसाचे उत्पन्न होणार आहे; पण तेही परवडणारे नसल्याचे शेतकऱ्याने सांगितले. हे ऐकून आश्चर्य वाटले. मग, शेतकऱ्याने खर्चाचा हिशेब मांडला. एक एकराला किमान २५ हजार रुपये खर्च आहे. आठ एकराला दोन लाख रुपये आजपर्यंत खर्च झाला. ७० क्विंटल उत्पन्नातून चार हजार रुपये हमीभावाप्रमाणे दोन लाख ८० हजार रुपये मिळतील; म्हणजे वर्षभराची कमाई केवळ ८० हजार रुपये. त्यातही अन्य खर्च आहेतच. यावर मात करण्यासाठीही प्रयत्न केले जाणार असल्याचे पाटेकर यांनी सांगितले.
आत्मिक समाधान मिळते
शेतकरी आत्महत्या करतात, हे विदारक आहे. त्या कुटुंबांना मदत करून आत्मिक समाधान मिळते; पण हे काम येथेच थांबणारे नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना कसा आळा घालता येईल, शेतकऱ्यांची स्थिती कशी सुधारता येईल, या दिशेने नामकडून काम केले जाणार आहे. यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक असल्याचेही नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी सांगितले.

Web Title: I have never been in politics and I have never been there

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.