सावकाराच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या
By Admin | Updated: June 11, 2016 02:29 IST2016-06-11T02:29:57+5:302016-06-11T02:29:57+5:30
शेळ्या खरेदी करण्याकरिता गावातील सावकाराकडून मासिक पाच टक्के शेकडा दराने कर्ज घेतले. ते कर्ज व्याजासह फेडण्याची तयारी दर्शवूनही दामदुप्पट व्याजाची मागणी सावकाराकडून करण्यात आली.

सावकाराच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या
पत्नीचा आरोप : पुलगाव ठाण्यात तक्रार दाखल, कठोर कारवाईची मागणी
वर्धा : शेळ्या खरेदी करण्याकरिता गावातील सावकाराकडून मासिक पाच टक्के शेकडा दराने कर्ज घेतले. ते कर्ज व्याजासह फेडण्याची तयारी दर्शवूनही दामदुप्पट व्याजाची मागणी सावकाराकडून करण्यात आली. शिवाय सावकाराकडून घरी, सार्वजनिक ठिकाणी कर्जाकरिता धमक्या, अपमानास्पद वागणूक देणे, मारहाणही करण्यात आली. अशातच इसारपत्र करून दिलेल्या शेतजमिनीची विक्री करण्याकरिता नोटीस पाठविल्याने मोहन भोयर (४०) यांनी आत्महत्या केल्याची तक्रार पत्नी सुचिता भोयर यांनी पुलगाव पोलिसात केली.
सुचिता भोयर यांनी सावकार हरिभाऊ साठे रा. नाचणगाव यांच्या जाचाला कंटाळून मोहन भोयर यांनी आत्महत्या केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पती-पत्नी, सासरे, दोन मुली असे कुटुंब तळणी (भागवत) येथे शेती व मजुरी करून जगत असल्याचे सुचिता यांनी सांगितले. २७ जून २०१३ रोजी मोहन भोयर यांनी शेतीचा इसार करून देत साठे यांच्याकडून शेळ्या घेण्याकरिता ४० हजार रुपये घेतले. पुढे सावकाराने ३० मे २०१४ ची खरेदी मुदत असल्याचे सांगत वकिलामार्फत नोटीस पाठविला. मोहन भोयर यांनी काही लोकांसोबत जाऊन सावकाराची भेट घेतली व व्याजासह एकूण ६० हजार रुपये देण्याची तयारी दर्शविली; पण सावकाराने शब्द फिरवून जादा व्याजाची मागणी करीत ९२ हजार रुपये मागितले. तो एवढ्यावरच थांबला नाही तर शिवीगाळ, धमक्या सुरू झाल्या. २ जून २०१६ ला पती हे श्याम बरडे यांच्यासोबत नाचणगाव येथील कृषी विभागाच्या कार्यालयात जात असताना सावकाराने त्यांना अडवून मारहाण केली. त्यांचे कपडेही फाडले. या अपमानास्पद वागणुकीने मनस्थिती खालावल्यने त्यांनी विष घेतले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अखेर त्यांचा ८ जूनला मृत्यू झाला. ते अखरेपर्यंत सावकाराने केलेल्या छळामुळेच आत्महत्या करीत असल्याचे सांगत राहिले. मागील चार-पाच वर्षांत शेतीने दगा दिला. शेळ्या विकून बॅँकेच्या कर्जाचे हप्ते भरणे सुरू होते. उपचाराकरिता नातलगांनी ६० ते ७० हजार रुपये लावले. त्यामुळे कर्जाचा डोंगर आणखी वाढला आहे. घरातील कर्ता पुरुष गमावला. याला सदर सावकारच जबाबदार असून त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुचिता भोयर यांनी केली आहे.(प्रतिनिधी)