हिंगणी वनपरिक्षेत्रात हरणाची शिकार
By Admin | Updated: November 26, 2014 23:10 IST2014-11-26T23:10:11+5:302014-11-26T23:10:11+5:30
हिंगणी वनपरिक्षेत्राच्या आकोली बिटात हरणाची (भेडकी) शिकार करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. शिकार केलेल्या हरणाचे मांस शिकाऱ्यांनी विकल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

हिंगणी वनपरिक्षेत्रात हरणाची शिकार
एकास अटक; एक फरार : कातडे नदीत फेकले
आकोली : हिंगणी वनपरिक्षेत्राच्या आकोली बिटात हरणाची (भेडकी) शिकार करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. शिकार केलेल्या हरणाचे मांस शिकाऱ्यांनी विकल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली असून त्याचा सहाकरी आरोपी फरार झाला आहे. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. अटक करण्यात आलेल्याचे नाव कैलास पुरूषोत्तम पारिसे (३२) असे असून त्याचा सहकारी सुनील पळासराम पचारे (२५) हा फरार झाला आहे. हे दोघेही सुकळी (बाई) येथील रहिवासी आहेत.
सविस्तर वृत्त असे की, खरांगणा वनपरिक्षेत्राच्या आकोली बिटातील मौजा मसाळा येथील कम्पार्टमेंट नंबर २१८ मध्ये शिकारदारांनी जाळे लावून हरणाची शिकार केली. आरोपी कैलास पारिसे व सुनील पचारे दोघेही रा. सुकळी (बाई) यांनी हरिण गावात आणले घरामागील मागील बाजूस त्याला कापले. त्याचे मांस गावात विकल्याची कबुली दिली. हरिणाचे कातडे धामनदीत स्मशानभूमीजवळ नदीपात्रात फेकल्याची कबुली त्यांनी दिली. वनाधिकाऱ्यांनी कातडे शोधण्याचा प्रयत्न केला; पण खोल पाण्यात कातडे शोधता आले नाही. मात्र त्याच्या घरून रक्ताने माखलेले पोते, रक्तमिश्रित माती व मासांचे नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आरोपीकडून शिकारीचे जाळे, तराजू, दोन किलो मांस, दोन गंज जप्त करण्यात आले आहे. मात्र आरोपींनी हरिणाचे मुंडके कुठे लपवून ठेवले. त्याला कापण्याकरिता कोणत्या हत्याराचा वापर केला. शिवाय शिकार करताना प्रत्यक्षात दोघेचे होते वा आणखी सहकारी होते, या बाबी अद्याप समोर आल्या नाहीत. आरोपीच्या घरून दोन किलो मांस जप्त करण्यात आले. त्याने इतर मांसाची विल्हेवाट कशी लावली याचा उलगडा अद्याप झाला नाही. याचा तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही कारवार्ई वनपरिक्षेत्र अधिकारी एस.डी. खोब्रागडे, वनरक्षक सोनाली श्रीरामे, व्ही.एन. खेलकर, जे. एस. काळबांडे, एस. वाय आगासे, एस. एल. ठाकरे, जी.डी. साबळे, वनमजुर भिमराव सोनटकके, दिनेश मसराम, अशोक वाटकर, यांनी केली.(वार्ताहर)