वाहनांमुळे शिकारीवर आळा बसेल
By Admin | Updated: August 7, 2016 00:23 IST2016-08-07T00:23:29+5:302016-08-07T00:23:29+5:30
वन विभागाकडून शासनाना खूप अपेक्षा असतात; पण साधनांअभावी हा विभाग अपेक्षा पूर्ण करू शकत नाही.

वाहनांमुळे शिकारीवर आळा बसेल
रामदास तडस : वर्धा, आष्टी व खरागंणा वनपरिक्षेत्रासाठी गस्त वाहन
वर्धा : वन विभागाकडून शासनाना खूप अपेक्षा असतात; पण साधनांअभावी हा विभाग अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. म्हणूनच राज्य शासनाने वन विभागाला गस्त वाहन उपलब्ध करून दिले आहे. या वाहनांमुळे यापुढे अधिक जबाबदारीने वन्य व इतरही प्राण्याचे संरक्षण होईल व शिकारीवर आळा बसेल, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.
वन विभागाला प्राप्त झालेल्या गस्त वाहनांचे हस्तांतरण खासदार रामदास तडस यांच्या हस्ते वनविभागाच्या कार्यालयात करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला उपवनसंरक्षक दिंगबर पगार, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा साळवे, पिपल फॉर अॅनिमल संस्थेचे आशिष गोसावी उपस्थित होते.
तडस यावेळी म्हणाले, एकाच दिवशी दोन कोटी पेक्षा जास्त झाडे लावून महाराष्ट्राने देशात इतिहास रचला आहे. या निमित्ताने वृक्षारोपणाबाबत नागरिकामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली. त्यामुळे हे अभियान लोकांचे झाले, हे याचे सर्वात मोठे यश आहे. लोकसभेत अनेक चांगले निर्णय होतात. देशाचे नागरिक म्हणून सर्व योजना ग्रामीण भागापर्यंत पोहचविण्यात आपण सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी कर्मचाऱ्यांना केले. त्यांच्या हस्ते वर्धा, आष्टी, खरागंणा येथील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना गाडीची चावी देण्यात आली. आजपासून तीन गाड्या वन विभागाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत.
वाहनांबाबत माहिती देताना उपवन संरक्षक पगार म्हणाले, प्राण्याने एखाद्यावर हल्ला केल्यास तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी गाडीचा उपयोग होईल. वन संरक्षणासाठी या गाड्या महत्त्वाची भूमिका बजावणार असून शिकार व तस्करीतही निश्चितच घट होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाला वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)