एसटी महामंडळाच्या १५०० कर्मचाऱ्यांवर उपासमारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 05:00 AM2020-10-17T05:00:00+5:302020-10-17T05:00:02+5:30

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे परिवहन महामंडळाच्या एसटीचीही चाके जागीच थांबली होती. त्यामुळे महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडाले. याचा कर्मचाऱ्यांच्या वेतनावरही परिणाम झाला. आधीच कर्मचाऱ्यांना महामंडळाकडून तुटपुंजे वेतन दिले जाते. त्यातही कोरोनामुळे महामंडळाचे उत्पन्न बंद झाल्याने काही काळ कर्मचाऱ्यांना विनावेतनच राहावे लागले.

Hunger strike on 1500 employees of ST Corporation | एसटी महामंडळाच्या १५०० कर्मचाऱ्यांवर उपासमारी

एसटी महामंडळाच्या १५०० कर्मचाऱ्यांवर उपासमारी

Next
ठळक मुद्देदोन महिन्यांचे वेतन थकीत : वर्धा विभागातील स्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धा विभागांतर्गत कार्यरत १५०० कर्मचाऱ्यांचे वेतन मागील दोन महिन्यांपासून थकीत आहे. कोरोनामुळे आधीच संकटात असलेल्या कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ ओढवली आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे परिवहन महामंडळाच्या एसटीचीही चाके जागीच थांबली होती. त्यामुळे महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडाले. याचा कर्मचाऱ्यांच्या वेतनावरही परिणाम झाला. आधीच कर्मचाऱ्यांना महामंडळाकडून तुटपुंजे वेतन दिले जाते. त्यातही कोरोनामुळे महामंडळाचे उत्पन्न बंद झाल्याने काही काळ कर्मचाऱ्यांना विनावेतनच राहावे लागले.
साडेचार-पाच महिन्यांच्या कालावधीनंतर जून महिन्यात जिल्हांतर्गत एसटीच्या मोजक्याच फेऱ्या सुरू झाल्या. दरम्यानच्या काळातही कर्मचाऱ्याना ५० टक्के म्हणजये निम्मेच वेतन देण्यात आले. त्यामुळे चालक, वाहक व इतर कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा मोठा सामना करावा लागला. पंधरवड्यापूर्वी एसटीची पूर्णक्षमतेने वाहतूक सुरू झाली आहे. मात्र, प्रवाशांचा प्रतिसाद अद्याप अल्पच आहे. त्यामुळे वर्धा विभागांतर्गत कार्यरत १५०० कर्मचाऱ्यांना ॲागस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांचे अद्याप वेतन न मिळाल्याने आर्थिक चणचण सोसावी लागत आहे. महामंडळानी वेतनाचा प्रश्न तातडीने निकाली काढत होणारी आर्थिक ओढाताण थांबवावी, अशी मागणी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे.

उत्पन्नवाढीसाठी कर्मचाऱ्यांवर दबाव?
कोरोना महामारीमुळे प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरविली. त्यामुळे महामंडळ तोट्यात आले आहे. परिणामी सद्यस्थितीत एसटी उत्पन्नवाढीसाठी दबाव आणला जात असल्याची माहिती एका चालकाने नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर दिली. तोट्याचे कारण दर्शवून अथवा कमी उत्पन्नाचे कारण पुढे करून वेतन प्रलंबित ठेवणे, अनियमितता असणे तसेच वेतनासोबत कर्ज कपातीमुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या हातात तोकडी रक्कम पडणार आहे. त्यामुळे एसटी कामगार चिंताग्रस्त आहेत. हीच परिस्थिती कायम राहिली तर उपजीविका कुणाच्या भरवशावर करावी, असा प्रश्न कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

वेतनावर महिन्याकाठी सव्वादोन कोटींचा खर्च
वर्धा विभागांतर्गत वर्ध्यासह, आर्वी, पुलगाव, हिंगणघाट आणि तळेगाव (श्यामजीपंत) हे पाच आगार आहेत. या संपूर्ण आगारात १५०० च्या जवळपास कर्मचारी कार्यरत आहेत. कर्मचाऱ्यांच्या वेतनावर महिन्याकाठी महामंडळाकडून २ कोटी २५ लाखांचा खर्च होतो. मात्र, प्रवाशांनी पाठ फिरविल्याने अद्याप महामंडळ तोट्यात असल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याचा प्रश्न महामंडळापुढे निर्माण झाला असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून बोलले जात आहे.

माता-पित्यांची फरपट
अनेक एसटी कर्मचाऱ्यांकडे वयोवृद्ध माता-पिता असून त्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी कर्मचार्यांवरच आहे. वेतनाअभावी वयोवृद्ध माता-पित्यांचा औषधोपचार आणि नियमित तपासण्यांचा खर्च कोठून करावा, हा यक्ष प्रश्न त्यांच्यापुढे आहे.

Web Title: Hunger strike on 1500 employees of ST Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.