पंचकल्याणक महोत्सवाला राज्यभरातील भाविकांची हजेरी

By Admin | Updated: February 16, 2015 01:40 IST2015-02-16T01:40:21+5:302015-02-16T01:40:21+5:30

साडेचारशे वर्षांची परंपरा सांगणाऱ्या विजयगोपाल येथील अतिशयक्षेत्र दिगंबर जैन मंदिराच्या जीर्णोद्धारानंतर पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सव व विश्वशांती महायज्ञ होत आहे.

Hundreds of devotees across the state celebrate the Panchkalyanak Mahotsav | पंचकल्याणक महोत्सवाला राज्यभरातील भाविकांची हजेरी

पंचकल्याणक महोत्सवाला राज्यभरातील भाविकांची हजेरी

पुलगाव : साडेचारशे वर्षांची परंपरा सांगणाऱ्या विजयगोपाल येथील अतिशयक्षेत्र दिगंबर जैन मंदिराच्या जीर्णोद्धारानंतर पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सव व विश्वशांती महायज्ञ होत आहे. येथील जिनालयात समाजबांधवांनी निर्माण केलेल्या २४ फुट उंचीच्या मानस्तंभाच्या वेदी प्रतिष्ठेसाठी मांगल्यपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. या महोत्सवात रविवारी दीक्षाकल्याणक महोत्सव पार पडला. यावेळी राज्यभरातून जैन समाजबांधवांची उपस्थिती होती.
या दीक्षाकल्याणक महोत्सवात मूलनायक आदीनाथस्वामींचा राज्याभिषेक विवाहसोहळा थाटात करण्यात आला. यावेळी मंगलाचरण सुहासिनी, श्वेतवस्त्रधारी श्रावक व पिवळ्या साड्या परिधान केलेल्या श्राविका यांच्यासह गजराजाच्या अंबारीवर विराजमान सुहासिनी व यजमान यांची मिरवणूक भाविकांचे आकर्षण ठरली.
आचार्य सन्मती सागरजी मलराजाचे शिष्य ज्योतीपुंज मुनीश्री सुवीरसागरजी महाराज यांचे सानिध्य तसेच झुल्लकश्री, सुप्रज्ञसागरजी व मुनीसंघाचे आर्शिवचनात भगवतंताचा अभिषेक, मंगलाचरण मंत्रशुद्धी वेदीशुद्धी होऊन रविवारला सकाळी तृतीय चरणात तपकल्याणक महोत्सवाला प्रारंभ झाला़ या महोत्सवासाठी उज्जैन येथील रामेश्वरजी यांचे गजराज या मिरवणुकीसाठी आले आहे़
या महोत्सवाचे पौरोहित्य रायपूर येथील वाणीभूषण प्रतिष्ठाचार्य पं़ ऋषभ अजित शास्त्री यांचे मार्गदर्शनात कारंजा (लाड) येथील आदेश जैन श्रेयस जैन, नागपूरचे संदीप जैन करीत आहे. भोपाल येथील कुलदीपकुमार व संगीत संच आपल्या रसाळ सुमधूर संगीत वाद्यवृंद्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध करून भवसागराच्या धारेत चिंब भिजवीत आहे. विजयगोपाल येथील जिनालयासमोर २४ फुट उंच मानस्तंभ निर्माण करण्यात आला असून या कितीस्तंभाच्या चारही दिशांना मुलनायक आदिनाथांच्या प्रतिमा असतील़ या प्रतिमाचे पुजन विलास शेंडेकार (नागपूर), अरूणकुमार बदनोरे (पुलगाव), डॉ़ प्रकाश नानोटी (विजयगोपाल), श्रीकुमार वावलकर (अमरावती) यांचे हस्ते मुनीश्री व मुनीसंघ करणार आहे. तपकल्याणक महोत्सवात भगवंताचे मातापिता सौधर्मइंद, धनपती कुबेरइंद्र, महायज्ञनाथक यांचेसह इंद्र इंद्राणी, अष्ठकुमारिका, ८१ सुहासिनी श्रावक श्राविकांनी आदिनाथ भगवंताचा विवाह, राज्यभिषेक व दीक्षाविधान इत्यादी प्रसंग व्यासपीठावरील राजदरबारात पार पडले. रविवारला पार पडलेल्या महोत्सवाचे यजमानपद प्रज्ञा प्रफुल जुननकर, कारंजा (लाड) यांनी भूषविले तर कच्छ महाकच्छ राजांची भूमिका भास्कर पोहरे (यवतमाळ), शरद काळे (जळगाव) यांनी पार पाडली़
सोमवारला ज्ञानकल्याणक महोत्सवात जिनाभिषेकक महामुनी आदिनाथांची सुधारस आहार केवलज्ञान समवशरण केवलज्ञानविधी ज्ञानकल्याणकविधी होईल. यानंतर दुपारी १२ वाजता गजराज मिरवणूक निघेल. महोत्सवात समाजबांधवांसह औरंगाबादचे महसूल उपायुक्त जितेन पापळकर, उमरेडचे उपविभागीय अधिकारी उमेश काळे, पांढरवकडा एस़डी़ओ़ संदीप महाजन, निवृत्त पोलीस अधीक्षक प्रकाश महाजन आदींची प्रमुख उपस्थिती होती. त्यांचा यावेळी स्मृतिचिन्ह, श्रीफळ देवून सत्कार केला.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Hundreds of devotees across the state celebrate the Panchkalyanak Mahotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.