पीक अन् भावही कमी, सांगा जगावे तरी कसे!
By Admin | Updated: November 22, 2014 23:05 IST2014-11-22T23:05:33+5:302014-11-22T23:05:33+5:30
सोयाबीनची नापिकी, कपाशीवर आलेला रोग, अशात निघालेल्या उत्पन्नाला मिळणारा अत्यल्प दर, अशातच उभ्या असलेल्या पिकांवरही वाढता रोगाचा प्रभाव त्यातच सावकाराचे वाढते कर्ज,

पीक अन् भावही कमी, सांगा जगावे तरी कसे!
काढणीचाही खर्च निघत नसल्याने सोयाबीन शेतातच वखरले
वर्धा : सोयाबीनची नापिकी, कपाशीवर आलेला रोग, अशात निघालेल्या उत्पन्नाला मिळणारा अत्यल्प दर, अशातच उभ्या असलेल्या पिकांवरही वाढता रोगाचा प्रभाव त्यातच सावकाराचे वाढते कर्ज, अशा बिकट स्थितीत जगावे तरी कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. खरीपाची ही स्थिती लक्षात घेवून शासनाने शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला दर देण्याची अपेक्षाही धूसरच असल्याचे चित्र आहे.
पूर्वी पावसाने मारलेल्या दडीमुळे पेरण्या मोडकळीस आल्या. यात आशेवर असलेल्या शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. तिही उगविली नाही. पुन्हा कर्ज घेऊन तिबार पेरणी केली. ती कशीबशी उगविली; मात्र उशिर झाल्याने उत्पन्नाची आशा राहिली नाही. काही भागात सोयाबीन उगविले, त्याची वाढच झाली नाही. तीन महिन्यांच्या कालावधीचे हे पीक असल्याने दिवाळीच्या पूर्वी ते निघण्याची वेळ आली. अशात सोयाबीनची वाढ झाली नसल्याने शेतकऱ्यांनी त्याची सवंगणी करण्याचे टाळले. काहींनी हिंमत करून सोयाबीनची कापणी केली. यात सोयाबीनचा दाना ज्वारीसारखा झाला. हा दाना पाहून शेतकऱ्यांची आशा मावळली. उत्पन्न निघणार नसल्याचे लक्षात येताच काही गावातील शेतकऱ्यांनी सवंगणी करण्यापेक्षा त्याची वखरणी करण्याचा निर्णय घेतला.
हिच स्थिती कपाशीची झाली. उन्ह पावसाच्या खेळात कपाशीवर पहिले मर रोग, नंतर लाल्याचा हल्ला झाला. यात उत्पन्न होणार नसल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी लावला. दिवाळी झाली तरी बाजारात कपाशीचे बोंड आले नाही. यामुळे यंदाच्या सत्रात कपाशीचे उत्पन्न कमी होणार हा अंदाज व्यापाऱ्यांना आला. त्यांनी याचवेळी शेतकऱ्यांची लुट करण्याचा निर्णय घेतला. अशात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिल असे वाटत असताना तसे झाले नाही. शासनाने जाहीर केलेला हमीभाव त्याच्याकरिता अत्यल्प ठरला. या हमीभावानुसार खरेदी होईल असे वाटत असताना कापूस खरेदी करणाऱ्या शासनाच्या एजन्सींनी शेतकऱ्यांना धोकाच दिला. त्यांच्याकडूनही अत्यल्प दरात कपाशीची खरेदी होवू लागली. यात शेतकऱ्यांची चहूबाजूंनी कोंडी झाली. अशात बऱ्याच गावाची आणेवारी ५० च्या आत आल्याने मदतीची आशा वाढली, एवढेच यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांच्या बाजूने झाले.